कृषी विभागाची धडक कारवाई; शेतकरी संघटनेचा अध्यक्ष जाळ्यात

जळगाव – जिल्ह्यातील चोपडा येथे बनावट कापूस बियाणे, तर धरणगाव तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ बनावट खतांचा साठा मिळून आला. चोपड्यात स्वदेशी-५ या बनावट कापूस बियाणांच्या विक्री प्रकरणी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षालाच अटक करण्यात आली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बनावट बियाणे व खतांचा साठा मिळून आल्याने शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्वदेशी-५ वाण खरेदी न करण्याचे आवाहन कृषी अधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे. बी. टी. कपाशी बियाण्यांचे दरही निश्‍चित करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>लासलगाव बाजार समितीत दोनही गट एकत्र; सभापतिपदी बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापतिपदी गणेश डोमाडे

खरीप हंगामाला अद्याप सुरुवातही झालेली नाही. मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडही अद्याप सुरू झालेली नाही. त्यात बियाणे विक्रीलाही कृषी विभागाकडून परवानगी नाही. तत्पूर्वीच कपाशीचे बनावट बियाणे व रासायनिक खतांची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संदीप पाटील (३५, रा. वर्डी, ता. चोपडा) यांनी संबंधित बियाणे चोपडा येथे विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली. चोपडा- धरणगाव रस्त्यावरील हॉटेल न्यू सुनीतामध्ये बनावट बियाणे असल्याची गोपनीय माहिती गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळाली. चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांच्या मदतीने हॉटेलमध्ये तपासणी केली. संदीप पाटील हे प्लास्टिकच्या दोन पिशव्या ठेवून गेल्याची माहिती हॉटेलचे व्यवस्थापक अमोल राजपूत यांनी दिली. त्या पिशव्यांची तपासणी केली असता, त्यात अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी-५ संकर देशी कपाशी बियाणे असलेली ९९हजार ५७० रुपये किमतीची ९५ सीलबंद पाकिटे आढळून आली. तायडे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात संदीप पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित संदीप पाटील याला वर्डी येथून ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा >>>नाशिक: बुडाल्याने वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ परवाना क्षेत्राच्या बाहेर चारशे ऑरगॅनिक मॅन्युअल या खताच्या बॅग उतरविल्या जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच मंडळ अधिकारी के. एच. देसले यांनी मालमोटार धरणगाव पोलीस ठाण्यात आणली. खतांचे नमुने चाचणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नांद्रा येथील जैन बायोटेक अ‍ॅण्ड रिसर्च या दुकानाच्या या बॅग होत्या. ही खते त्यांनी तालुक्यातील तीन शेतकर्‍यांना विकल्याची माहिती व संबंधित कागदपत्रे अधिकार्‍यांना दाखविली. कृषी विभागाने या चारशे खतांच्या पिशव्या जप्त केल्या आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर, तसेच परवाना क्षेत्राच्या बाहेर विक्री केल्याप्रकरणी पुढील सुनावणी करण्यात येणार आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रदीप चव्हाण, विजय पवार, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, मंडळ कृषी अधिकारी के. एच. देसले, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे आदी उपस्थित होते.

स्वदेशी-5 खरेदी न करण्याचे आवाहन

गुणनियंत्रणासाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. खरीप हंगाम- २०२३ मध्ये अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी-५ हे वाण बीजोत्पादन होऊ न शकल्याच्या कारणाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे स्वदेशी-५ चे बियाणे बाजारात मिळाले तर ते बनावट असेल, असे कंपनीने कळविले असल्याने ते खरेदी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकार्‍यांनी केले आहे.

हेही वाचा >>>मालेगाव: पावणेदोन कोटी वसुलीसाठी रावळगाव चॉकलेट कारखान्यावर कारवाई

बी. टी. कपाशी बियाण्यांचे दर निश्‍चित

खरीप हंगामासाठी बीटी संकरित कपाशीच्या बीजी-१ वाणांसाठी प्रतिपाकीट ६३५ रुपये, तर बीजी-२ वाणासाठी प्रतिपाकीट ८५३ रुपये किंमत निश्‍चित करण्यात आली आहे. खरीप हंगाम-२०२३ अंतर्गत कपाशी बियाण्यांचा संभाव्य ६३ हजार ७२४ हेक्टर क्षेत्रासाठी तीन लाख १८ हजार ६२० कापूस बियाणे पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. कपाशी बियाणे पुरेशी उपलब्ध होणार असल्याने शेतकर्‍यांना कमतरता भासणार नाही. शेतकर्‍यांनी अधिकृत कृषी केंद्रातून रीतसर पक्के बिल घेऊन बियाणे खरेदी करावे. जादा दराने बियाणे विक्री होत असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून तक्रार करावी. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशी बियाणे लागवड एक जून २०२३ पासून करावी, असे आवाहन कृषी अधिकार्‍यांनी केले आहे.