लोकसत्ता वार्ताहर
धुळे – नामांकित जिंदाल स्टिल कंपनीच्या नावाचा शिक्का वापरुन येथील चाळीसगाव रोडवरील एका कारखान्यात लोखंडी पट्ट्या बनविण्याचा गैरप्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. या कारवाईत २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारखाना मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
येथील शंभर फुटी रोडवरील कारखान्यात नामांकित जिंदाल स्टिल कंपनीच्या नावाचा शिक्का मारुन लोखंडी पट्ट्या बनविल्या जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानंतर अधीक्षक श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत निरीक्षक शिंदे, चाळीसगावरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, उपनिरीक्षक अमरजित मोरे, हवालदार.मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, शोऐब बेग, राजू गिते यांच्या पथकासोबत संबंधित कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी कारखान्यात घरात पीओपी करण्यासाठी वापरण्यात येणार्या लोखंडी पट्ट्या बनवून, त्या पट्ट्यांवर जिंदाल स्टिल कंपनीचा शिक्का मारला जात होता. यावेळी पोलिसांनी मालक मुक्तार खान शहजाद खान याला ताब्यात घेतले. हा तयार माल जिंदाल कंपनीच्या नावाने बाजारात विक्री केला जात होता, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
आणखी वाचा-नंदुरबारमध्ये देशातील पहिली सिकलसेल स्कॅनिंग प्रयोगशाळा, पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन
या कारवाईत २० हजार ६५० किलो वजनाचे एकूण १८६ लोखंडी पट्ट्यांचे गठ्ठे मिळून आले. त्यांची किंमत एकूण १८ लाख ७६ हजार रुपये इतकी आहे. चार लाख रूपये किंमतीचे लोखंडी यंत्र, निलकमल कंपनीचे दीड लाख रुपयांचे प्रिंटर मशिन, ५० किलो वजनाचा पत्र्याचा साडेचार हजार रूपये किंमतीचा गोलाकार गठ्ठा, दोन हजार रुपयांच्या २० सिलींग पट्ट्या असा एकूण २४ लाख ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात हवालदार मच्छिंद्र पाटील यांचे फिर्यादीवरून मुख्तार खान विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.