धुळे: तालुक्यातील कावठी शिवारात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. सोमवारी सकाळी केलेल्या या कारवाईत मालमोटारीसह ९५ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माध्यमांना ही माहिती दिली. तालुक्यातील फागणे ते बाभुळवाडी दरम्यान बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि संशयास्पद मालमोटार थांबविली. मालमोटारीची तपासणी केली असता देशी दारू असलेले खोके आढळले. मोटारीतील संशयित रवींद्र परदेशी याची चौकशी करून खात्री केली असता तालुक्यातील कावठी शिवारात बनावट दारूचा कारखाना असल्याची माहिती मिळाली. अधीक्षक बारकुंड यांनी पोलीस पथकासह धुळे तालुक्यातील कावठी शिवारात छाप घातला यावेळी बनावट दारू तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा: मालेगाव: शालेय पोषण आहाराचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक
याठिकाणी स्पिरिट सदृश्य रसायन,पाणी,रिकाम्या बाटल्या,बुच,स्टिकर्स, पाणी शुद्धीकरण यंत्र,जलवाहिनी,वीज पंप असे साहित्य आढळले. मालमोटार, तीन लाख ५० हजार रुपये किमतीची बनावट दारू,१६ लाख ५० हजार रुपयांचे ३० पिंप स्पिरिट,एक लाखाच्या पेट्या,चार लाख ९० हजाराच्या रिकाम्या बाटल्या,एक लाख २९ हजाराच्या बनावट दारूच्या भरलेल्या बाटल्या,१४ हजाराची बनावट दारू,११ लाखाची गाडी ,७० हजाराच्या दोन मोटारसायकल, दोन लाखाचे जनरेटर असा जवळपास ९५ लाख ७७ हजार,८०० रुपयांचा मुद्देमाल आढळला. धुळे तालुका पोलिसांनी या प्रकरणी सोपान परदेशी,सागर भोई,सुनील देवरे,सचिन देवरे व नितीन लोहार (सर्व रा.शिरूड ता.धुळ), शांतीलाल मराठे (वरचे गाव शिरपूर), ज्ञानेश्वर राजपूत (दहिन्दुले ता.नंदुरबार), दिनेश गायकवाड (रा.साक्री), गुलाब शिंदे (कावठी ता.धुळे) आणि वाहन चालक अशा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.