मेजर पदावर असल्याची बतावणी करीत लष्करी गणवेशात वावरणाऱ्या तोतया अधिकाऱ्याने बेरोजगार युवकांना लष्करी भरतीचे अमिष दाखवत लाखो रुपयांना फसवणूक केल्याचे लष्कराच्या गुप्तचर (एमआय) आणि लासलगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून उघड झाले आहे. या प्रकरणी संशयित तोतया मेजर बाबू आव्हाडला येवला तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले. तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे. या टोळीचे जाळे राज्यातील अनेक जिल्ह्यांसह उत्तर प्रदेश व उत्तराखंडपर्यंत पसरलेले असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.
हेही वाचा- मालेगाव : दाभाडीत पालकमंत्री भुसे गटाची जीत आणि हार
या संदर्भात पाचोरे बुद्रुक येथील गणेश नागरे या युवकाने तक्रार दिली होती. गणेश व त्याचा मित्र आकाश यादव यांची संशयितांनी सैन्य दलातील लोकसेवक असल्याचे भासवून १० लाख २० हजार रुपयांना फसवणूक केली. या तक्रारीच्या आधारे लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गुप्तचर विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. संशयित बाबू आव्हाड सैन्य दलाच्या सेवेत जाऊ इच्छिणाऱ्यांना हेरून त्यांना नोकरीचे अमिष दाखवायचा. लष्करी गणवेशात वावरत असल्याने त्याच्यावर कुणाचाही विश्वास बसत असे. संशयित आव्हाड व त्याचे साथीदार युवकांना उत्तराखंड येथे लष्करी भरतीसाठी घेऊन जायचे. तिथे लष्करी अभियांत्रिकी सेवेत नौकरी मिळाल्याचे पत्र आणि ओळखपत्रही दिले गेल्याची माहिती पुढे आली आहे.
येवला तालुक्यातील आंबेगाव येथून तोतया मेजर बापू आव्हाडला अटक करण्यात आली. या प्रकरणी बापूसह त्याचे साथीदार सत्यजीत कांबळे (श्रीगोंदा, नगर), राहुल गुरव (देवीबाभुळ, बीड) आणि विशाल बाबर (डेळेवाडी, कराड, सातारा) यांच्याविरुध्द लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात आले.
तोतया अधिकाऱ्याकडून झेंडावंदनही
तोतया लष्करी अधिकारी बापू आव्हाडने आपल्या गावातही लष्करात मेजर म्हणून रुजू झाल्याचे सांगितले होते. येवला तालुक्यातील आंबेगाव हे त्याचे गाव. सैन्य दलात मोठ्या पदावर अधिकारी झाल्याने आव्हाडला गावच्या संरपंचांनी स्वातंत्रदिनी झेंडावंदनासाठी निमंत्रित केले होते. आव्हाडच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी गावातील झेंडावंदन झाले होते.