पिंपळगाव बसवंत : शहरापासून जवळच असलेल्या साकोरा (मिग) फाटय़ावर कारने अचानक पेट घेतल्याने चालक शेतकरी संजय शिंदे (५४) यांचा होरपळून मृत्यू झाला. साकोऱ्याच्या सरपंच विमल शिंदे यांचे ते पती होत. मंगळवारी सकाळी ११ वाजता हा अपघात झाला.
निफाड तालुक्यातील साकोरा (मिग) येथील प्रगतशील शेतकरी संजय शिंदे हे सकाळी मारुती सियाझ या कारने पिंपळगाव बसवंतकडे निघाले होते. शिंदे यांची कार साकोरा फाटय़ावरून पिंपळगाव बसवंतकडे जात असताना कारने अचानक पेट घेतला. कारचे सर्व दरवाजे आणि काचा बंद असल्यामुळे बाहेर पडणे शिंदे यांना शक्य झाले नाही. क्षणार्धात संपूर्ण कारने पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी कारच्या पाठीमागील काच फोडली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. आगीने रौद्र रूप धारण के ल्याने शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत अग्निशमन दलाने धाव घेत आग नियंत्रणात आणली. पिंपळगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश चौधरी, महामार्गच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षां कदम यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मदतकार्यास अडथळे आले. शिंदे हे साकोरा (मिग) येथील विद्यमान सरपंच विमल शिंदे यांचे पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.