नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याचा लासलगाव येथे कांदा विक्रीसाठी घेऊन जाताना अपघाती मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरने कांदा घेऊन जात असताना रस्त्यातील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करताना संबंधित शेतकरी ट्रॅक्टरच्या चाकाजवळ पडला, या भयावह घटनेत शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजय नानासाहेब उगले असं ३० वर्षीय मृत पावलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. मृत अजय उगले हे आज (शनिवार) कांद्याने भरलेला ट्रॅकर घेऊन मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घेऊन गेले होते. पण तिथे कांद्याला कमी भाव मिळाल्यामुळे त्यांनी वडिलांशी चर्चा केली आणि लासलगाव येथे कांद्याला जास्त भाव मिळेल, असं सांगितलं.

यानंतर, मृत शेतकरी अजय उगले हे कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेपोटी ट्रॅक्टर घेऊन लासलगावच्या दिशेनं निघाले. दरम्यान, चांदवड तालुक्यातील निंबाळे शिवारात रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना शेतकरी अजय उगले यांच्या हातातून ट्रॅक्टरची स्टेरिंग सुटली आणि ते चाकाजवळ पडले. त्यानंतर क्षणार्धात ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबले. या दुर्दैवी अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अजय उगले यांना बाहेर काढून मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer died in road accident while going to sell onion nashik video rno news rmm
Show comments