लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील प्रगतिशील तरुण शेतकर्याने चक्क शेतात वाजतगाजत कपाशी लागवडीला सुरुवात केली. एकप्रकारे त्याने गतवर्षीच्या घरात पडून असलेल्या जुन्या कापसाकडे सरकारचे पुन्हा लक्ष वेधले. शेतकरी राजाचा हा नादच खुळा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
रब्बीतील काढणीची सर्व कामे पूर्ण करून आता शेतकरी खरीप हंगामाची तयारीही पूर्णत्वास आली आहे. शेतकरी पीकपेरणीसाठी मशागत करण्यात व्यस्त दिसून येत आहेत. दुसखेडा (ता. पाचोरा) येथील प्रगतिशील तरुण शेतकरी नितीन महाजन यांनी शेतात चक्क वाजतगाजत कपाशी लागवडीस सुरुवात केली. शेतातील रब्बीतील सर्व पिकाची काढणी झाली आहे. जरी रब्बीतील शेतात पिकविलेल्या पिकांना भाव नसल्याने शेतकर्यांचे कंबरडे मोड़ले असले, तरी बळीराजा मोठ्या जोमाने खरिपाच्या तयारीला लागला आहे.
हेही वाचा… अवैध वाळू वाहतुकीवरून आजी-माजी मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप
नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या नेहमीच घसरणार्या दरामुळे शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती खलावली आहे. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकर्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला. जिल्ह्यात २०२१-२०२२ मध्ये सुमारे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा झाला होता. कोरडवाहू कपाशीचा पेरा तीन लाख चार हजार ३३ हेक्टर, तर बागायतीचा पेरा दोन लाख ३९ हजार २२९ हेक्टरवर झाला होता. २०२१ च्या खरीप हंगामात कापसाला प्रतिक्विंटल विक्रमी ११ ते १२ हजारांपर्यंत दर मिळाला होता. २०२२ मध्ये कापूस शेतकर्यांचा घरात आला.
हेही वाचा… शासकीय महाविद्यालयाकडे नंदुरबार जिल्हा रुग्णालय हस्तांतरीत न झाल्याने रुग्णांचे हाल
सुरुवातीला प्रतिक्विंटल नऊ ते साडेनऊ हजारांपर्यंत दर मिळाला. गतवर्षाप्रमाणे यंदाही कापसाचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. मात्र, मे महिना संपत आला तरीही कापसाचे दर काही वाढले नाहीत. उलट आता कापूस थेट सात हजारांखाली आले. शेतकर्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणून देणारे, सोन्यासारखे कापसाचे उत्पादन आजही घरात पडून आहे. एकूणच शेतमालाला अतिशय कमी भावामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात आहेत. असे असतानाही आता खरीप हंगामासाठी देशाचा पोशिंदा उभा राहत आहे आणि जोमाने पुन्हा कामाला लागला आहे. दुसखेडा येथील शेतकरी महाजन यांनी वाजतगाजत कपाशी लागवड केली. सुरुवातीला त्यांनी बियाण्यांच्या पाकिटांसह शेताची पूजा केली. त्यानंतर वाजतगाजत कपाशी बियाणे लागवड सुरू केली. या अनोख्या लागवडीच्या प्रयोगाची राज्यभर चर्चा सुरू आहे.