जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २०२३ वर्षाचा राज्यपातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार चोपडा तालुक्यातील पंचक येथील प्रगतिशील शेतकरी हेमचंद्र पाटील यांना जाहीर झाला आहे. यावर्षीचा हा पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी देण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून, ११ ऑगस्टला विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर. एस. माळी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. याच समारंभात विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक यांनाही पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक: जिल्ह्यात पाच ठिकाणी घरफोडी, लाखो रुपयांचा ऐवज लंपास

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या पुरस्कार निवडीसाठी जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यात भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष व कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा मुंबई विद्यापीठाच्या जैवशास्त्र विभागाचे प्रा. संजय देशमुख यांचा समावेश होता. समितीने जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पंचक येथील प्रगतिशील शेतकरी हेमचंद्र पाटील यांची निवडीची शिफारस केली. आधुनिक शेती करताना एकात्मिक सेंद्रिय व रासायनिक पद्धतीचा अवलंब करून एकात्मिक कीड व रोगांचे नियंत्रण करून सेंद्रिय पद्धतीने जमिनीची सुपीकता टिकवीत उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यात पाटील यांना यश मिळाले आहे. त्यांच्या या शेतीतील प्रयोगांचा नव्या पिढीला निश्चितच फायदा होईल, असा विश्वस समितीने व्यक्त करून पाटील यांना हा पुरस्कार जाहीर केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer hemchandra patil to get poet bahinabai chaudhari award zws
Show comments