लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: जिल्ह्यात बिबट्याने पाळीव पशुंवर हल्ले करणे, लहान मुलांना फरफटत नेणे अशा घटना वारंवार घडत असून चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील शेतकरी भगवंत चौधरी हे सोमवारी सकाळी आठच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चौधरी सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला होताच चौधरी यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात चौधरी यांच्या छातीवर, पाठीवर ठिकठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने वडाळीभोई आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिंजरा लावण्यात आला आहे.