नाशिक – देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकऱ्याने मध्यरात्री घरालगतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चाळीत साठविलेला कांदा खराब झाल्यामुळे कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करायची, या विवंंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.
प्रताप बापू जाधव (३६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे. अल्प शेतीत कष्ट करून ते संसाराचा गाडा हाकत होते. सातत्याने नापिकीला त्यांना तोंड द्यावे लागत होते. यावर्षी पावसाने ओढ दिली. उन्हाळ्यात खर्च करून कांद्याचे उत्पादन घेतले. भाव मिळेल या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र तोही पूर्णतः खराब झाला. बँक कर्ज देत नसल्याने या संकटात अधिकच भर पडली. कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करावी आणि दैनंदिन खर्च कसा भागवावा, या विवंचनेत असलेल्या जाधव यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता नातेवाईक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>>लग्नाचे आमिष दाखवून एक लाख रुपयांना गंडा
शुक्रवारी रात्री घरातील मंडळी झोपली असताना जाधव यांनी घरालगतच्या विहिरीत उडी घेतली. शनिवारी सकाळी जाधव हे घरात नसल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी शोधाशोध केली असता त्यांचे स्वेटर विहिरीजवळ आढळून आले. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच आसपासच्या नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्याबाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.