लोकसत्ता वार्ताहर

देवळा : तालुक्यातील भावड बारी ते रामेश्वर फाटा या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामास तीन दिवसांपूर्वी बंदोबस्तात सुरुवात झाली असताना शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता ट्रॅक्टर, बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करुन रास्ता रोको आंदोलन करत काम बंद पाडले. यामुळे काही काळ वाहतूक सेवा ठप्प झाली होती.

आंदोलनस्थळी शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी मध्यस्थी करून दोन दिवसांत पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याबरोबर शेतकरी आणि संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. जोपर्यंत मार्ग निघत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याची सूचना ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आली.

आणखी वाचा- नाशिक: नगरसूल शिवारात बिबट्याचा वावर, शेळीवर हल्ला

दरम्यान, अनेक दिवसांपासून या महामार्गावरील रस्त्याचे काम रेंगाळल्याने वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विंचूर- प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून आठ किलोमीटर एका बाजूचे काम पूर्ण झाले असून दुहेरी मार्गाचे पन्नास टक्के काम झाले आहे. सहा महिन्यापासून राष्ट्रीय महामार्गालगतच्या शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी मोजून द्याव्यात आणि त्यातील किती अधिग्रहण होणार आहे, हे सांगावे अशी मागणी करत आहेत. याकामी संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्यात वारंवार वाद होऊन काम बंद ठेवण्यात आले.

एकेरी वाहतूक करत असताना बाजूच्या अर्धवट असलेल्या कामांवर सुमारे तीन फुटांपर्यत उंचवटा असल्याने वाहनधारकांना आठ किलोमीटर अतर जीव मुठीत ठेवून वाहन चालवावे लागते. शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोबदल्याबाबत स्पष्टता अद्याप होत नसल्याने सहा महिन्यांपासून काम बंद केले होते. दोन ते तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकार आणि संबंधित ठेकेदार यांनी बंदोबस्तात सदरचे काम सुरू केले. त्यामुळे संबधीत शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होऊन त्यांनी रास्ता रोको करत काम बंद केले. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख चौधरी यांनी जागेवर येऊन संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांशी चर्चा केली. मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात शेतकरी, अधिकारी, ठेकेदार यांची बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

आणखी वाचा-नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

यावेळी शिंदे गटाचे ग्रामीण उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, चांदवडचे उपजिल्हा प्रमुख शांताराम ठाकरे ,मविप्र संचालक विजय पगार, तालुकाप्रमुख दीपक निकम आदींनी शेतकऱ्यांची समजूत काढली. यावेळी संबंधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .