सकाळी ७०० ते ९०० रुपये क्विंटल दराने खरेदी केलेला कांदा लासलगाव बाजार समितीत दुपारी व्यापाऱ्यांनी अवघ्या २०० ते ३०० रुपयांनी घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकऱ्यांमधील असंतोष उफाळून आला. भाव पाडून खरेदीला आक्षेप घेण्यात आला. काही शेतकरी कांदा विक्री न करता माघारी फिरले. काहींनी ट्रॅक्टरमधील कांदा घेऊन बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या दिला. याच सुमारास समितीत सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. कांदा लिलावावर बाजार समितीचे लक्ष नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कामगारांच्या वेतनाची रक्कम पळविणाऱ्यास अटक; सिन्नर औद्योगिक पोलिसांची कामगिरी

पावसाळ्याचा हंगाम तोंडावर असल्याने लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. साठवणुकीची व्यवस्था नसल्याने खळ्यातील कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकांना मिळेल त्या भावात विक्री करावी लागत असल्याचे चित्र आहे. बुधवारी सकाळी बाजार समितीत सुमारे १३ हजार क्विंटलची आवक झाली होती. बाजार समितीच्या माहितीनुसार सकाळच्या सत्रातील लिलावात प्रति क्विंटल २५१ ते १२०१ आणि सरासरी ७०० रुपये दर मिळाले. प्रारंभी व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतिचा कांदा ७०० ते ९०० रुपयांनी खरेदी केला. मात्र सत्र संपण्याच्या सुमारास तो भाव २०० ते ३०० रुपयांवर आणल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. इतक्या कमी दरात कांदा विक्रीला शेतकऱ्यांनी विरोध केला. काही संतप्त शेतकऱ्यांनी दर पाडण्याचा जाब विचारल्यावर व्यापारी लिलाव सोडून निघून गेले. काहींनी याच दरात माल दिला तर काही शेतकरी माल घेऊन माघारी फिरले. व्यापाऱ्यांच्या कार्यशैलीकडे लक्ष वेधण्यासाठी काही शेतकरी ट्रॅक्टरमधील कांदा घेऊन बाजार समितीच्या कार्यालयासमोर पोहोचले. पण, समिती प्रशासनाकडून लिलावाकडे लक्ष दिले जात नसल्याने व्यापारी मनमानी करीत असल्याची तक्रार उगावचे शेतकरी विशाल कोल्हे यांनी केली.

हेही वाचा >>> धुळे: पाच हजार वाहन चालक परवान्याच्या प्रतिक्षेत; अडीच महिन्यांपासून काम बंद

लासलगाव बाजार समितीत दुपारी १२ वाजता सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे दुपारपर्यंत ट्रॅक्टर घेऊन थांबूनही कुणी लक्ष दिले नसल्याची तक्रार कोल्हे यांनी केली.

प्रतवारीनुसार व्यापाऱ्यांकडून दर

व्यापारी कांद्याच्या प्रतवारीनुसार भाव निश्चित करतात. बाजार समितीचा त्याच्याशी संबंध नसतो. उगावचे कोल्हे यांच्यासह काही शेतकऱ्यांचा माल दुय्यम दर्जाचा होता. त्यामुळे त्यांच्या मालास २२० ते ३०० रुपये भाव मिळाला. याचवेळी निर्यातक्षम म्हणजे चांगल्या प्रतीच्या कांद्याला याच दिवशी १२०० रुपयांपर्यंत भाव मिळाले. उपरोक्त शेतकऱ्याला बाजार समितीने त्यांना दोन पर्याय दिले. जवळच्या विंचूर बाजार समितीत माल विकता येईल अथवा मालाची प्रतवारी करून तो पुन्हा बाजारात आणल्यास चांगल्या दर्जाच्या मालाला दरही चांगले मिळू शकतील. पण कोल्हे हे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. – नरेंद्र वाढवणे (सचिव, लासलगाव बाजार समिती)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers angry over onion price argue with traders in lasalgaon market committee zws
Show comments