लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादकांना अवकाळी पावसासह गारपिटीमुळे नुकसान सोसावे लागल्यानंतर, भाव कमी झाल्याने मोठा आर्थिक फटका काही दिवसांपूर्वी बसला होता. मात्र, अवकाळी पावसाचे वातावरण निवळल्यानंतर आता पुन्हा केळीच्या भावात सुधारणा झाली असून, संबंधित सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने ४० अंश सेल्सिअसवर असल्याने, निसवणीच्या अवस्थेतील नवती केळी बागांची होरपळ वाढली आहे. तशात अवकाळी पाऊस व तुरळक ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. किमान १००१, कमाल २०५० आणि सरासरी १५११ रुपयांपर्यंत असलेले केळीचे भाव ४०० ते ६०० रुपयांनी घसरले होते. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी काढणीची घाई केल्यामुळेही व्यापाऱ्यांना केळीचे भाव पाडण्याची संधी मिळाली होती. दरम्यान, अवकाळी पाऊस थांबल्यानंतरही लगेच भाव वाढविण्यास व्यापाऱ्यांनी तत्परता न दाखविल्याने केळी उत्पादकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली.
यथावकाश, अवकाळीचे ढग निवळल्यानंतर आता कुठे केळीचे भाव हळूहळू सुधारताना दिसून येत आहेत. खासकरून बऱ्हाणपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज १२५ ते १४० गाडी आवक होत असतानाही, केळीला कमाल १८०० आणि सरासरी १४५१ रुपयांपर्यंत भाव आता मिळत आहे. त्याठिकाणी १०-१२ दिवसांपूर्वी केळीला कमाल १३०० आणि सरासरी ११०० रुपयांचा जेमतेम भाव होता. त्यातुलनेत आता केळीच्या भावात साधारण ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मागणीच्या मानाने बाजारात फार आवक नसल्याने, केळीचे भाव आगामी काळातही टिकून राहण्याची शक्यता जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तापमान वाढल्यानंतर नवती केळी बागांच्या निसवणीवर परिणाम झाला असून, बाजारात तयार मालाची उपलब्धता तशी कमीच आहे. त्यामुळे पुढील काळातही केळीचे भाव स्थिर राहण्याची शक्यता वाटते आहे. -डॉ.रवींद्र निकम (केळी उत्पादक, माचला, ता. चोपडा)