नाशिक – इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आणि कळवण असे काही मुसळधार पाऊस झालेले डोंगरमाथ्याचे भाग वगळता इतरत्र मध्यम ते तुरळक हजेरी लावल्यानंतर रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे दमदार पर्जन्यवृष्टीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी वर्गाच्या चिंतेत अधिक भर पडली. दमदार पावसाअभावी पेरण्यांना उशीर होत असल्याने हंगाम कसा जाईल, हा प्रश्न त्यांना सतावतो आहे.
यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्याने सर्वजण सुखावले होते. उशिरा का होईना, चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. पण मुसळधार पाऊस त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा व कळवण अशा डोंगराळ भागापुरताच सीमित राहिला. यातील बहुतांश क्षेत्र भाताचे आहे. तिथे भाताची रोपे टाकण्याचे काम सुरू झाले. उर्वरित १० तालुक्यांमध्ये अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागाने पुढील दोन, तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, दमदार स्वरुपात पाऊस झाला नाही. या तालुक्यात अपेक्षित पाऊस होईपर्यंत पेरण्यांसाठी थांबायला हवे, असे कृषी विभागाने आधीच म्हटले होते. ७५ मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा – जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्याबरोबर
गत आठवड्यात काही भागांत मुसळधार पाऊस झाला असला तरी इतरत्र पावसाच्या केवळ सरी कोसळल्या. मनमाड परिसरात केवळ एकदाच मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. उर्वरित दिवसांत अनेक भागांत दोन, तीनदा चांगल्या सरी बरसल्या. या व्यतिरिक्त रिपरिप सुरू होती. त्यामुळे अजूनही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाविना पेरण्याची कामे थांबली आहेत. ज्यांनी पेरण्या केल्या त्यांना दुबार पेरणीचे संकट उद्भभवेल अशी चिंता सतावत आहे. शनिवारपासून पावसाने विश्रांती घेतली असून सूर्यदर्शन झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने चिंतेचे ढग मात्र गडद झाले आहेत.