लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: ऑगस्ट महिना सुरू झाला तरी मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने यंदा सरासरी देखील गाठलेली नाही. तुरळक पावसात केलेल्या पेरण्या वाया जातात की काय, अशी काही भागात धास्ती असताना काही ठिकाणी तर पावसाअभावी पेरण्याही झालेल्या नाहीत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत आहे. रिमझिम स्वरुपात पाऊस होत असल्याने मनमाडसारख्या ठिकाणी टंचाईचे संकटही भेडसावू शकते.

आठ दिवसापासून गायब झालेला पाऊस मनमाड शहर परिसरात मंगळवारी सकाळपासून पुन्हा अवतरला. दिवसभरात अधूनमधून तुरळक सरी कोसळल्या. किरकोळ स्वरूपात का होईना, पाऊस परतला असला तरी अनेक भागात दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. गत वर्षी जुलै महिन्याच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वच चिंतेत पडले आहेत. यंदा रिमझिमशिवाय एखादा अपवाद वगळता नांदगाव तालुक्यात दमदार पाऊस झालाच नाही. सुरूवातीला झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी लागवड व पेरणी केली. ती वाया जाते की काय, अशी चिंता निर्माण झालेली असतांना रिमझिम स्वरूपात पावसाने हजेरी लावली. पावसाचे दोन महिने पूर्ण झाले. आता पुढील दोन महिन्यात काय होईल, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. अत्यल्प पावसाने शहरातील दैनंदिन होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती असून अजून काही दिवस पावसाने दांडी मारल्यास पाणी पुरवठ्याची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-नाशिकची आघाडी, शासकीय योजनांची अमलबजावणी

जिल्ह्यातील घाटमाथा परिसर वगळता अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात एक ऑगस्टपर्यंत सर्वसाधारणपणे ४९१.९ मिलीमीटर पाऊस पडतो. या वर्षी ३३१.४ मिलीमीटर म्हणजे केवळ ६७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ६६४.७ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या जवळपास सव्वा पटहूून अधिक पाऊस झाला होता. सध्या पुष्य नक्षत्राचे अखेरचे चरण सुरू आहे. तीन ऑगस्टपासून आश्लेषा नक्षत्र सुरू होत आहे. मनमाड परिसरात दरवर्षी आश्लेषा, पूर्वा, उत्तरा, हस्त या नक्षत्रात हमखास पाऊस पडतो. त्यामुळे आगामी काळात परिसरात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

आणखी वाचा-नाशिक खड्डेमय; वाहतूक कोंडीसह अपघातास आमंत्रण, वाहनांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही भागात पेरण्याही खोळंबल्या

जिल्ह्यातील सिन्नरसह अनेक तालुक्यात पावसाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी अद्याप पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरल्यानंतर त्यातून विसर्ग करण्यात आला. मराठवाड्यातील नेत्यांच्या दबावामुळे पाणी सोडण्यात आल्याची साशंकता व्यक्त झाली. परंतु, त्यात कुठलेही तथ्य नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक महिन्यात धरणात किती जलसाठा करायचा याचे पाटबंधारे विभागाचे निकष असतात. त्यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्याने धरणे भरली जातात. हे संबंधित विभागाने सर्वसाधारण नियोजन असल्याचे ते म्हणाले.