मालेगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे कर्ज वसुलीसाठी जमिनी लिलाव करण्याच्या सुरु झालेल्या प्रक्रियेविरोधात येथे काढलेला शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर स्थगित करण्यात आला आहे. या संदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनास एक महिन्याची मुदत दिली आहे. तोपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड मोर्चा नेण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.
थकीत कर्ज वसुलीसाठी नाशिक जिल्हा बँकेतर्फे ६२ हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनींची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सक्तीची कर्ज वसुली व या लिलाव प्रक्रियेच्या विरोधात विविध शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या संघटनांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या येथील निवासस्थानी बिऱ्हाड मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यावर आंदोलकांनी येथील कॉलेज मैदानावर ठिय्या मांडला. या ठिकाणी दिवसभर शेतकऱ्यांचे बिऱ्हाड मोर्चा आंदोलन सुरु होते. या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचेशी पालकमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री मोरेश्वर सावे यांनी दूरध्वनीवरून केलेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला.
हेही वाचा >>> VIDEO : “ए, गई बोला ना…काय पो छो..” म्हणत येवल्यातील पतंगबाजीचा आतषबाजीने समारोप
थकीत कर्जावर सहा ते आठ टक्के दराने सरळ व्याज आकारणी केली जाईल, शेतकऱ्यांवर लादण्यात आलेली सक्तीची कर्ज वसुली शिथिल केली जाईल, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे एक रकमी कर्ज परत फेड योजना राबविली जाईल असे आश्वासन यावेळी शासनाच्या वतीने उभय मंत्र्यांनी आंदोलकांना दिले. जिल्ह्यातील दीड हजारावर शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावाच्या अंतिम प्रक्रियेत आहेत. या प्रक्रियेस स्थगिती दिली जाईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले. या सर्व प्रक्रियेसाठी शासनाला १६ फेब्रुवारी पर्यंतचा अल्टीमेटम देत आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. जर तोपर्यंत या मागण्यांची तड लागली नाही तर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा नेण्याचा इशारादेखील आंदोलकांनी यावेळी दिला.