सततच्या नापिकीमुळे उदरनिर्वाह करणे अवघड झाले असतानाच कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणाच्या खर्चाचा भार पेलणे असह्य़ होऊन वैफल्यग्रस्त झालेल्या तालुक्यातील सोनज येथील गणेश हिंमत बच्छाव (३३) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पक्षघाताचा विकार जडलेले वडील, आई, अपंग भाऊ, पत्नी, मुलगा व आजारी मुलगी अशा परिवारातील कर्ता असलेल्या गणेशच्या कुटुंबीयांकडे सोनज शिवारात साडे चार एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. गेली तीन वर्षे दुष्काळामुळे शेतातून उत्पन्न मिळू शकले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले असतांनाच कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणाचा खर्च वाढत गेल्याने ते चिंताग्रस्त होते. पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळून असलेले वृद्ध वडील तसेच अपंगत्व आलेला लहान भाऊ यांचा सांभाळ करताना दमछाक होत असतांनाच सहा वर्षांच्या मुलीला फुफ्फुसाचा विकार जडल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. मुलीला दर आठवडय़ाला उपचारासाठी नाशिक येथे नेणे भाग पडत असल्याने त्यांना आर्थिक समस्यांनी घेरले होते. शेतातून उत्पन्न हाती लागत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह व आजारपणाचा खर्च भागविणे असह्य़ झाले असतानाच स्थानिक विकास संस्थेकडून घेतलेले ४५ हजाराचे कर्ज फेडणेदेखील त्यांना शक्य झाले नाही. या परिस्थितीत गणेशने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
मालेगावी शेतकऱ्याची आत्महत्या
गेली तीन वर्षे दुष्काळामुळे शेतातून उत्पन्न मिळू शकले नाही.
Written by झियाऊद्दीन सय्यद
First published on: 02-12-2015 at 04:17 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers committed suicide in malegaon