नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिवडा ते पांढुर्ली रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात सिमंतिनी कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचे तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात सिन्नर- घोटी महामार्गावर पांढुर्ली चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांची नेहमीच शिवडा- पांढुर्ली रस्त्याने ये- जा असते. त्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेकदा अपघात झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी समृद्धीच्या अधिकाऱ्यांना आणि बांधकाम विभागाला वेळोवेळी रस्ता दुरुस्त करण्यास सांगूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा…नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा रुग्णवाहिकेतच प्रसूती, आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा
समृद्धीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी भूमिका कोकाटे यांनी घेतली. यावेळी समृद्धीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अधिकाऱ्यांनी रस्ता तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त करुन देतो, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनावर सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख, सिन्नर पोलीस अधिकारी लक्ष ठेवून होते.