निफाड तालुक्यातील शेती तसेच पिण्याच्या पाण्यासाठी गंगापूर डावा कालवा आणि पालखेड उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने मोर्चेकऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली.
बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात मोठय़ा प्रमाणावर शेतकरी सामील असल्याने सीबीएसकडे येणारी वाहतूक अन्यत्र वळविण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली. निफाड तालुक्यात अत्यल्प पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पालखेड उजव्या कालवाअंतर्गत खडक सुकेणे, कु र्णोली, साकोरे, कोकणगांव, ओझर, शिरसगांव, सुकेणे, वडाळी, पिंप्री, रसलपूर या गावांमध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महिलांनी हंडा मोर्चाही काढला होता. द्राक्ष बागांची पाण्याअभावी परिस्थिती गंभीर बनली आहे. तत्काळ पाणी न दिल्यास बागा पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. भविष्यात पावसाची शाश्वती नसल्याने शेतकरी पिके वाचविण्यासाठी आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षाव्यतिरिक्त मका, गहू अशी पिके घेतली आहेत. परंतु, पाण्याअभावी या पिकांची परिस्थिती बिकट आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाईचा अहवाल वेळोवेळी सादर करत त्वरित पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात येऊनही नाशिक पाटबंधारे विभागाने त्याची दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अलीकडेच पालक मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण होऊनही व वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणी सोडण्यास विलंब होत असल्याचा आरोप आ. कदम यांनी केला आहे. आम्ही सत्तेत असलो तरी शेतकरी आमचे आहेत, असा घरचा अहेरही त्यांनी दिला.

Story img Loader