नाशिक – टोमॅटो विकून चार महिने होऊनही आडत आणि व्यापाऱ्यांकडून तसेच बाजार समिती प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समितीच्या कार्यालय प्रवेशव्दारावर आंदोलन करुन सभापती तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार दिलीप बनकर यांची गाडी रोखली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर बनकर यांनी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार वारंवार होत असतात. काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळतो. काही प्रकरणांमध्ये त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. प्रामुख्याने द्राक्ष आणि कांदा उत्पादकांच्या नुकसानीचे प्रमाण अधिक असते. परंतु, आता टोमॅटो उत्पादकांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुकृपा या आडतद्वारे शेतकऱ्यांचे टोमॅटो खरेदी करण्यात आले होते. परंतु, टोमॅटो खरेदी करून सदर अडत्याने पाच महिने झाले तरीही शेतकऱ्यांचे दोन कोटी ४५ लाख रुपये दिले नाहीत. पैशांसाठी वेळोवेळी शेतकऱ्यांनी पोलीस ठाणे, बाजार समिती प्रशासन, मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा केला. कोणतीही ठोस कारवाई बाजार समिती तसेच प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोर आंदोलन केले होते. कांदा लिलाव बंद पाडले होते. त्यानंतर संचालक मंडळानी १५ मार्च रोजी सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी परिविक्षाधीन पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री उपस्थित होत्या.
१५ मार्च रोजी आमदार तथा सभापती दिलीप बनकर, उपसभापती, संचालक मंडळ आणि शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीत गुरुकृपा आडतचे आप्पा होळकर यांची जमीन विक्री झाल्यावर शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील, असे बनकर यांनी सांगितले. वरिष्ठ कार्यलयाकडून योग्य अधिकार प्राप्त झाल्यास तत्काळ निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सभापती बनकर यांनी मांडली. परंतु, या निर्णयास शेतकऱ्यांनी विरोध करुन बाजार समिती कार्यालयाच्या प्रवेशव्दारावरच ठिय्या दिला. सभापती तथा आमदार बनकर यांची गाडी रोखली. त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासानंतर सभापती बनकर, संचालक मंडळ यांनी पोलीस अधिकारी अग्निहोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. ३० एप्रिलपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी बाजार समिती प्रशासन पुढाकार घेत असल्याचे अश्वासन बनकर यांनी दिल्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले