नाशिक – सोन्याचे दर वाढत असतांना गहू, तांदळाचा भाव का वाढत नाही ? देशाला रोज अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांनी आता अशा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारकडे काही मागू नये. सरकार कोणते आणायचे, हे ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी. असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराजवळील मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स येथे सोमवारपासून दोन दिवसीय अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनास सुरुवात झाली. संमेलनाचे उद्घाटक नाना पाटेकर तर, ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे हे संमेलनाध्यक्ष आहेत.

हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्यास…. अ‍ॅड. रोहिणी खडसेंचा आरोप

यावेळी पाटेकर यांनी, केवळ गोंजारणारे दु:ख न मांडता शेतकऱ्यांच्या अस्सल वेदनांना ताकदीने वाचा फोडण्याची गरज मांडली. शेतकऱ्याने आता मरु नये. केवळ चांगले दिवस येतील याची वाट पाहू नये तर, जिद्दीने चांगले दिवस आणावेत. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी साहित्य संमेलनाच्या उपक्रमाला नाम फाउंडेशनकडून दोन लाख रुपये देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष विलास शिंदे यांंनी, शरद जोशी यांची चतुरंग शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यावर सह्याद्री फार्म्समार्फत प्रयत्न केला असून शरद जोशींची ही संकल्पना भारतीय शेतीचे भवितव्य उजळविणारी असल्याचे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे यांनी, साहित्यिक आणि शेतकरी दोघेही मोठे व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार सरोजताई काशीकर यांनी, शेतकऱ्याला खंबीरपणे दुःखातून बाहेर आणणारे साहित्य निर्माण करण्यावर साहित्यिकांनी भर द्यावा, असे आवाहन केले. वामनराव चटप यांनीही मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा – मविआचे जागा वाटप, फक्त चार जागांवर… बाळासाहेब थोरात यांचा विश्वास

यावेळी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अखिल भारतीय शेतकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गंगाधर मुटे, संमेलनाचे संयोजक ॲड. सतीश बोरुळकर हेही उपस्थित होते. मुटे यांनी प्रास्ताविक केले. एच-स्क्वेअर इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले.

शेतकऱ्यांविषयक साहित्याकडे सन्मानाने पाहणे गरजेचे

साहित्य म्हणजे फक्त ललित साहित्य अशा मर्यादित अर्थाने साहित्याकडे पाहिले जाते. विचारप्रधान साहित्य हा साहित्याचा तितकाच महत्वाचा भाग असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या साहित्याकडेही सन्मानाने पाहिले पाहिजे, असे परखड मत संमेलनाध्यक्ष भानू काळे यांनी मांडले. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांमधील स्वाभिमान जागवला. त्याच्यातील आत्मसन्मान जागवला. अनुदान संस्कृतीवर त्यांनी कधीच भर दिला नाही. केवळ आंदोलनाने शेती प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव शरद जोशींना होती. एका मर्यादेपर्यंत ठिणगी गरजेची असते, पुढे दीर्घकाळ ज्योतीचीच गरज असते, असे त्यांनी मांडले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers should create the power to decide the government nana patekar statement at shetkari sahitya samelan ssb