लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्राम कृषी विकास आणि परिवर्तन योजनेत (स्मार्ट योजना) सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याने तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसह शेतकरी गटांनी मोठय़ा संख्येने या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन सटाणा तालुका कृषी अधिकारी एस. एस. पवार यांनी केले आहे.

विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित कांदा पिकासाठी शेतकरी प्रशिक्षण ताहाराबाद येथे झाले. या वेळी पवार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच सीताराम साळवे, उपसरपंच कांकरिया, कांदा संशोधन केंद्राचे डॉ. तुषार आमरे, शेतजमीन मीमांसा प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ रामदास पाटील, मंडळ कृषी अधिकारी एन. पी. भोये, कृषी पर्यवेक्षक पवार, आहेर यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पवार यांनी शेतकऱ्यांना स्मार्ट योजनेबाबत तपशीलवार माहिती देताना जमिनीचे संवर्धन, जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये यांचा वापर होण्यासाठी जैविक खतांचा वापर, माती आणि पाणी नमुना तपासणीची गरज, त्यामुळे होणारे फायदे याविषयी माहिती दिली. माती नमुना काढताना बांधाजवळील, पाणथळ जागेसह  झाडाखालील मातीचा नमुना घेऊ नये, अशा सूचनाही दिल्या. माती आणि पाणी तपासणी करून शिफारसींप्रमाणे खतांची मात्रा द्यावी, जैविक खताचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून रासायनिक खतासोबत सेंद्रिय खतांचा योग्य आणि संतुलित वापर करण्याचे आवाहनही त्यांनी के ले.

डॉ. तुषार आमरे यांनी कांदा बियाणे निवड, हंगामनिहाय सुधारित वाणाची निवड करून रोपवाटिकेतील व्यवस्थापन, बीजप्रक्रिया तसेच बुरशीनाशकांची प्रक्रिया करून बियाणे टाकण्यासह रोपवाटिकेतील व्यवस्थापन कसे करावे, याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. लागवडीपूर्वी सेंद्रिय खतांचा भरपूर वापर आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा, कांदा पिकावर खरिपात येणारा जांभळा करपा, रब्बीत येणारा तपकिरी करपा, काजळीसाठी बुरशीनाशकांचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. कांदा आणि डाळिंब पीक खत व्यवस्थापनाबाबत शास्त्रज्ञ रामदास पाटील यांनी शेतकऱ्यांना कांदा पीक खत व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. सेंद्रिय, रासायनिक, सूक्ष्म मूलद्रव्ये यांचा वापर करण्याविषयीही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. कृषी साहाय्यक जे. आर. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कृषी साहाय्यक जे. आर. पाटील यांनी केले.

Story img Loader