अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या बळीराजाला  आता थोड्याफार उत्पादित पांढर्‍या सोन्याच्या अर्थात कापूसचोरीच्या घटनांमुळे दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या कापूसवेचणीही सुरू आहे. शेतांमधून कापूसचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने बळीराजांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी भुरट्या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करीत चोरीचा कापूस घेणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जळगाव जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठापणाला; गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत

गतवर्षी कापसाला मिळालेला समाधानकारक भाव यामुळे कपाशी लागवड वाढली होती. जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. कापसाची वेचणी जोमाने सुरू आहे. दीपावलीदरम्यान उतरलेल्या कापसाच्या भावात आता काहीशी तेजी आली आहे. चांगल्या प्रतीच्या कापसाचे प्रतिक्विंटल दर साडेआठ हजारांवर गेले आहेत. चीनमध्ये कापसाची मागणी वाढल्याने निर्यातीची संधी उपलब्ध झाली आहे. कापसाच्या दरात सुधारणा झाल्याने जिनिंग उद्योजकांना शेतकर्‍यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.

कापूस दर वाढण्याची शेतकर्‍यांना आशा

गेल्या पंधरवड्यात कापसाचे प्रतिक्विंटलला दर सात हजारांपर्यंत होते. मात्र, दीपावलीनंतर कापसाच्या दरात थोड्याफार तेजी आली असून, गुणवत्ता व दर्जानुसार दर आठ ते साडेआठ हजारांपर्यंत आहेत. लांब धाग्याच्या कापसाला यापेक्षाही अधिक दर मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये कापसाच्या दोन ते तीन वेचण्या झाल्या आहेत. बळीराजाच्या घरात, शेतात आणि खळ्यांमधील पत्र्याच्या शेडमध्ये कापूस ठेवण्यात आला आहे. शेतकरी कापसाचे दर वाढतील या आशेने अजूनही बाजारात कापूस आणत नसल्याची स्थिती आहे.

हेही वाचा >>> जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक वादातून युवकांची हत्या करणाऱ्या दाम्पत्यास जन्मठेप

कापूसवेचणीसाठी मजूर मिळेना

सध्या कापूसवेचणी सुरू झाली असून, आतापर्यंत दोन-तीन वेचण्या झाल्या आहेत. क्विंटलभर कापूसवेचणीसाठी नऊशे ते हजार रुपये शेतीमालकाला खर्च करावे लागत आहेत. दिवाळीपूर्वीच कापूसवेचणी सुरू झाली होती. दिवाळीच्या सुटीत ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनीही कापूसवेचणीसाठी हातभार लावल्याचे चित्र होते. त्यांनी दिवसभरात दोनशे ते अडीचशे रुपये कमविले. एक मजूर वीस ते पंचवीस किलो कापूस वेचतो. त्यातून दहा रुपयांप्रमाणे दोनशे ते अडीचशे रुपये मिळतात. मात्र, आता राज्यासह जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याची स्थिती आहे. मजूर मिळाले तरी वेचणीचा भाव शेतकर्‍यांना परवडत नाही. लहरी हवामानामुळे शेतकर्‍यांचे कापसाचे उत्पादन घटल्याने झालेला खर्च वसूल होतो की नाही यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. मजूर मिळत नसल्याने काही ठिकाणी कुटुंबच कापूसवेचणीसाठी जात असल्याचे चित्र आहे.

पांढर्‍या सोन्याला चोरीचे ग्रहण

यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने खरिपातील कपाशीसह ऊस, सोयाबीन अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस असल्यामुळे कपाशी वेळेवर न फुटल्यामुळे वेचणीला उशीर झाला होता. सध्या सर्वत्र कापूस वेचणीचा हंगाम सुरू झाला आहे. आतापर्यंत दोन-तीन वेचण्याही झाल्या आहेत. मात्र, त्याचबरोबर कापूस चोरटेही सक्रिय झाले आहेत. जिल्ह्यात भुरट्या चोरट्यांनी आपला मोर्चा शेतीमालावर वळविला असून, सध्या पांढर्‍या सोन्याला समाधानकारक भाव मिळत असताना शेतातील, खळ्यांमधील पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला पांढर्‍या सोन्याला चोरीचे ग्रहण लागल्याच्या घटना समोर येत आहेत. रात्री शेतातून कापूस वेचून घेऊन जाणे हा प्रकारही सुरू झाल्यामुळे आता शेतात जाऊन कापसाचे राखण करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. कापूस चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे शेतात थोडाफार राहिलेला शिल्लक कापूस चोरी जात असल्याने शेतकर्‍यांनी डोक्याला हात लावला आहे. पोलिसांनी भुरट्या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करीत चोरीचा कापूस घेणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून करण्यात येत आहे.

पशुधनासह इतर साहित्य चोरी

जिल्ह्यात चोरट्यांनी आता शेतीमालासह शेतीसाहित्यांकडे मोर्चा वळवला आहे. शेतातील खळ्यांमधून शेतीमालासह साहित्य चोरीच्या घटना घटना घडत आहेत. त्यात ठिबक सिंचनच्या नळ्या, कृषिपंप, वीजवाहिन्या, यंत्रांंसह इतर साहित्य चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. चक्क बैल, म्हशी, गायीही चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटना जिल्ह्यात समोर येत आहेत. जिल्ह्यांतील पाचोरा, एरंडोल, चोपडा, अमळनेर, पारोळा, भडगाव, चाळीसगावसह भुसावळ उपविभागातही अशा घटना घडल्या आहेत. धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतही अशा घटना समोर आल्या आहेत.

शेतकरी वर्ग नेहमीच आसमानी आणि सुलतानी संकटांनी शोषला जातो. विशेषतः कापूस विक्री करताना कापसाचे पैसे न मिळणे, वजन-काट्यात चोरी होणे, असे प्रकार घडत असताना अलीकडे शेतातील कापूस चोरून नेणे, हे गंभीर प्रकार घडत असल्याने शेतकरीवर्ग चिंतित आहे. प्रशासनाने चौकशी करून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

सुनील रंगराव पाटील (कापूस उत्पादक शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते, वाडी-शेवाळे, ता. पाचोरा, जि. जळगाव)

शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटातच असतो. कधी अतिवृष्टी, कधी पावसाअभावी पिकांचे नुकसान होते. यंदा अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे त्याच्यावर आर्थिक संकट आहे. यंदा कापसाचे उत्पादनातही घट आली आहे. दीपावलीपूर्वी एक वेचणी झाली असून, आता दुसरी-तिसरी वेचणी सुरू आहे. वेचणीनंतर कापूस घरात अथवा शेतांमध्ये, खळ्यांमधील पत्र्याच्या शेडमध्ये कापूस ठेवला जात आहे.– दीपक कोळी (युवा शेतकरी, हुंबर्डे-कमखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers suffered financial loss due to cotton theft incidents zws
Show comments