देवळा : निर्यात खुली करावी, कांद्याला तीन हजार रुपये भाव द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी येथील पाच कंदील चौकात शेतकरी संघटनेच्या वतीने सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कांद्याला मिळणाऱ्या अल्प भावामुळे काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी कांदा उत्पादकांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. भाव वाढेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा साठवून ठेवला होता, परंतु भाव वाढण्याची शक्यता दिसत नसल्याने तसेच काही दिवसांत नवीन कांदा बाजारात आल्यावर आहे त्या कांद्याला मातीमोल भाव मिळेल, हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. तसेच बदलत्या हवामानामुळे चाळींमधील कांद्याची प्रतवारीही खालावू लागली आहे.
कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने पाच कंदील चौकात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार दिनेश शेलूकर, पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात केंद्र शासनाने कांदा निर्यात खुली करावी, कांद्याला तीन हजार रुपये भाव द्यावा, शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, रासायनिक खतासोबत इतर खरेदीची जोडणी बंद करून मुबलक खतपुरवठा करावा, अतिवृष्टीतील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनास कांदा उत्पादक, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, तालुका अध्यक्ष माणिकराव निकम, कुबेर जाधव आदींसह मोठय़ा संख्येने कांदा उत्पादक उपस्थित होते.