शेतकऱ्यांसह कामगारही सहभागी

नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी सोमवारी शहरातून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी वाहन मोर्चाने दिल्लीच्या दिशेने कूच के ले. मोर्चात आरामदायी बससह जीप, व्हॅन, मालवाहतूक वाहने आहेत. शेतकऱ्यांसह कामगारांचाही मोर्चात मोठय़ा प्रमाणावर सहभाग आहे. नियोजित वेळेपेक्षा मोर्चा उशिराने निघाल्याने सायंकाळी  मुंबई नाका, द्वारका चौक, रासबिहारी चौफु ली या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

नवीन कृषीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेनेही उडी घेतली आहे. सोमवारी राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिकसह अन्य भागांतून शेतकरी मिळेल त्या वाहनांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिक येथे दाखल झाले. लाल बावटय़ासह शेतकरी गोल्फ क्लब मैदानात उपस्थित झाले. कु ठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.

दिल्ली गाठण्याच्या निर्धाराने घर सोडलेल्या शेतकऱ्यांनी लाल बावटा हाती घेत केंद्र सरकारच्या कायद्यांविषयी आपला रोष व्यक्त के ला. हरसुलजवळील ठाणापाडा येथील संतोष चौधरी यांनी आपल्यासह सोळापेक्षा अधिक शेतकरी एकाच वाहनात असून तीन दिवसांत दिल्लीला पोहोचू असा अंदाज व्यक्त के ला. दिल्लीला किती दिवस थांबू, याविषयी आम्हाला काही माहिती नाही. या काळात पोटापाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी सरपणासह कोरडा शिधा घेतला आहे. उरलेले सामान तिथेच खरेदी करू. कायदे रद्द झाल्याशिवाय घरी परतणार नाही, असा निर्धार चौधरी यांनी व्यक्त के ला.

सुरगाण्याच्या शोभाबाई पोवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रोजची शेतमजुरी बुडवत २०० रुपयांची पदरमोड करत नाशिक गाठले आहे. आम्हाला जमीन नाही, भूमिहीन आहोत. आमच्यापर्यंत सरकारचे मोफत धान्य, शिधापत्रिके वरील अन्नधान्य पोहोचले नाही. मुलांच्या जेवणाचा प्रश्न असताना शेतमजुरी मिळत नाही. सरकार वनजमिनी नावावर करत नाही. गावात रस्ते नाहीत, वीज नाही याचा जाब ही मंडळी विचारतील म्हणून नाशिक गाठले. याआधी मुंबईला निघालेल्या पायी मोर्चातही सहभागी होते, असे त्यांनी सांगितले. जीवा कामडी यांनी शेतात माल पिकतो, पण बाजार समित्यांमध्ये अडवणूक होत असल्याचे नमूद के ले. या कायद्याने के वळ स्वरूप बदलणार आहे. याला विरोध होणे गरजेचे आहे म्हणून दिल्लीला जाणारच, असा निर्धार व्यक्त के ला.दरम्यान, मोर्चा निघण्यापूर्वी अनेकांना ही क्षणचित्रे आपल्या भ्रमणध्वनीमध्ये टिपण्याचा मोह आवरला नाही. मोर्चा नियोजित वेळेपेक्षा विलंबाने निघाला. या काळात मुक्काम गाठण्यापूर्वी काहींनी तिथेच सोबत आणलेली शिदोरी खोलली. सायंकाळी उशिराने मोर्चा निघाल्यामुळे मोर्चा मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली. मोर्चातील वाहने जाऊ देण्यासाठी इतर वाहतूक थांबविण्यात आल्याने मुंबई नाका, द्वारका, रासबिहारी चौफु ली या परिसरात वाहतूक कोंडी झाली.

Story img Loader