नाशिक : धुळे जिल्ह्यात बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यास जमिनीचा ताबा देणार नाही, असा इशारा शिंदखेडा तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी निदर्शनेही केली असून १३ जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.
धुळे जिल्ह्यातील बोरविहीर ते नरडाणा या रेल्वेमार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनी बागायती आहेत. संबंधित शेतकऱ्यांना शासनातर्फे जिराईत, कोरडवाहू जमिनीचा अत्यल्प मोबदला मिळाला आहे. वन, झाडे, ठिबक सिंचन, पाईप लाईन, विहीर, विंधनविहीर, बांधकाम यांचा अत्यल्प मोबदला मिळाला आहे. शेतक-यांच्या जमिनींचा आजचा भाव प्रतिएकर ४० ते ५० लाख रुपये आह. जमिनींचे योग्य मूल्यांकन करण्यात आलेले नसून त्यांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही. निवाड्याप्रमाणे देण्यात आलेली रक्कम, मोबदला शेतकऱ्यांना मान्य नसून योग्य मोबदला मिळाल्याशिवाय शेतजमिनीचा ताबा दिला जाणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा…मनपा आयुक्तांचे उद्यान विभागावर ताशेरे उद्याने, जॉगिंग ट्रॅकला बकाल स्वरुप
धुळे जिल्ह्यातील माळीच, मेलाणे,कलमाडी आणि वाघाडी यां गावातील भूसंपादन झालेल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनीही या रेल्वेमार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. अन्यायग्रस्त शेतकरी १३ जानेवारी रोजी मौजे दापुरा, दापुरी शिवारात उपोषणास बसणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. १७ जानेवारी रोजी मौजे माळीच शिवारात (ता. शिंदखेडा) माळीच, मेलाणे,कलमाडी आणि वाघाडी गावातील अन्यायग्रस्त शेतकरी आमरण उपोषण सुरु करतील, असे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजित सिसोदे यांनीही हीच मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.