लोकसत्ता वार्ताहर
मालेगाव: बागलाण तालुक्यातील मोसम खोरे तसेच मालेगाव तालुक्यातील काटवन व माळमाथा भागातील अनेक ठिकाणी शनिवारी गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळामुळे काही ठिकाणी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडली आणि छतावरची पत्रेही उडून गेली. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेत पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शनिवारी दुपारनंतर नामपूर,आखतवाडे,बिजोटे आदी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला आहे.अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधा उडाली. मालेगाव शहर व तालुका परिसरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण व प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारनंतर माळमाथा व काटवन परिसरातील डोंगराळे, कौळाणे, गाळणे, चिंचवे, विराणे आदी परिसरात प्रचंड वारा सुटला.पाठोपाठ अवकाळी पावसास सुरुवात झाली. सायंकाळी शहर परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या संकटामुळे काढणीला आलेले कांदे,डाळिंब,द्राक्ष अशा पिकांचे अतोनात नुकसान झाले.
बागलाण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशीही गारपीटसह वादळी पावसाचा तडाखा बसला. तालुक्यातील तीळवण परिसर व करंजाडी खोऱ्यात दुपारी झालेली गारपीट आणि वादळी पावसामुळे पत्र्यांचे शेड, कांदा, गव्हाचे, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार दिलीप बोरसे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील करजांड, निताणे, बिजोटे, आखतवाडे, द्याने, नामपूर, तिळवण, लखमापूर, यशवंत नगर आदी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी गारपीटसह तुफान वादळी पावसाचा तडाखा बसला. शिवारात शेतातील काढलेला गहु, कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पाउस आणि गारांचा १५ ते २० मिनिटे वर्षाव झाला. त्यात शेतीमालाचे नुकसान झाले. काढणीला आलेला गहु, हरभरा, कांदा भुईसपाट झाला. बिजोटे येथील शेतकऱ्यांच्या घरावरील सर्व पत्रे उडून संसार उघड्यावर पडला तर निताणे येथील शेतकरी भिला देवरे यांच्या शेतात काढून ठेवलेला रब्बी कांदा ओला झाला. भुयाणे येथील तानाजी अहिरे, भिला देवरे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. आरोग्य उपकेंद्राची भिंत कोसळली.
दरम्यान आमदार बोरसे यांनी नुकसान ग्रस्त पिकांची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसान झालेल्या पिकांचे तसेच पडझड झालेल्या घरांचे कांदा शेड, कांदा चाळी यांचे दोन दिवसात पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
मालेगावलाही फटका
मालेगाव शहर व तालुका परिसरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण व प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारनंतर माळमाथा व काटवन परिसरातील डोंगराळे,कौळाणे,गाळणे,चिंचवे,विराणे आदी परिसरात प्रचंड वारा सुटला.पाठोपाठ अवकाळी पावसास सुरुवात झाली. सायंकाळी शहर परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या संकटामुळे काढणीला आलेले कांदे, डाळिंब, द्राक्ष अशा पिकांचे अतोनात नुकसान झाले.