येथील श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २२ ते २६ जानेवारी या कालावधीत येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत सिंहस्थ स्नानाचा आनंद सेवेकऱ्यांना घेता यावा, यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांनी दिली. डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित या प्रदर्शनानिमित्त उभारण्यात येणाऱ्या शामियानाचे भूमिपूजन शुक्रवारी मोरे, आ. देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रस्टमार्फत कृषी महोत्सव, कृषी मेळावे, संशोधन, सेंद्रिय आधुनिक शेती, सात्त्विक शेती, गटशेती व थेट विक्री, शेतीचे वास्तुशास्त्र, कृषी पर्यटन, पशू गोवंश संवर्धन आदी उपक्रम राबविण्यात येतात. हे उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास पाच लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील अशी अपेक्षा संयोजक चंद्रकांत मोरे यांनी व्यक्त केली. महोत्सवाचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महोत्सवात द्राक्षबाग व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, पशू गोवंश संगोपन व व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता, डाळिंब व्यवस्थापन, दुष्काळातील शेती, कृषी उद्योजकता, कृषी काव्य संमेलन आदींसह कृषी कीर्तन, आदिवासी लोकनृत्य आदी उपक्रम होतील. तसेच अपारंपरिक ऊर्जा महोत्सव, भारत व कृषी संस्कृती दर्शन, पशुधन व गोवंश प्रदर्शन, दुर्मीळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन यावर भर देण्यात आला आहे. महोत्सवाच्या माध्यमातून सहभागी कंपन्या, स्वयंसेवी, शासकीय-निमशासकीय, सेवाभावी संस्था तसेच लोकसहभागातून शेतकऱ्यांना भांडवल, अवजारे बी-बियाणे, खते औषधे वाटप तसेच मुलांच्या शिक्षणासाठी मदत व विविध विषयांवर प्रशिक्षण देऊन दुष्काळावर मात करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा