नाशिक – आजारी सहा वर्षीय मुलाच्या औषधोपचारावर जास्त खर्च होत असल्याने संतप्त पित्याने संबंधितास घराच्या छताला उलटे टांगून १० ते १५ मिनिटे बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयित पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.

चांदवड तालुक्यातील धोतरखेडे गावात ही घटना घडली. याबाबत सुनीता बेंडकुळे यांनी तक्रार दिली. मंगेश बेंडकूळे असे संशयित पित्याचे नाव आहे. बेंडकुळे दाम्पत्याचा अल्पवयीन मुलगा सातत्याने आजारी पडत होता. त्यास गाठीचा आजार होता. त्याची तब्येत ठिक राहत नव्हती. बेंडकुळे दाम्पत्यांने उपचारासाठी त्याला वडाळीभोई येथील दवाखान्यात नेले होते. डॉक्टरांनी पिंपळगाव येथे सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्यासाठी जास्त खर्च लागणार असल्याने मंगेश बेंडकुळे हे मुलाला घेऊन घरी आले. त्यांनी मुलासह पत्नीला बेदम मारहाण केली. मुलाला दोरीने घरातील छताला उलटे टांगले. याच अवस्थेत त्याला बेदम मारहाण केली. मुलगा जिवाच्या आकांताने ओरडत होता. पत्नीलाही जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी सुनीता बेंडकुळे यांनी भ्रमणध्वनीत छायाचित्र टिपल्याने हा प्रकार समोर आला. अघोरी उपचाराचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त झाला. मात्र त्यात तथ्य नसून कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पिता मंगेश बेंडकुळेला अटक करण्यात आला आहे.