काँग्रेस प्रवक्त्यांच्या घरातील चोरी प्रकरण
नाशिक : काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या आणि नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून काम करणाऱ्या श्रीपत ऊर्फ बंडू म्हसे यांच्या अल्पवयीन मुलाने मित्राच्या मदतीने पाटील यांच्या घरात चोरी केली.
हा प्रकार सहन न झाल्याने अनेक वर्षांपासून पाटील यांच्याकडे प्रामाणिकपणे काम करणारे श्रीपत यांनी भगूर बस स्थानकात विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले
टिळकवाडी येथे पाटील यांचा ‘दौलत’ नावाचा बंगला आहे. या ठिकाणी म्हस्के सात वर्षांपासून नोकर म्हणून काम करीत होते. काही महिन्यांपूर्वी म्हसे यांचा अल्पवयीन मुलगा गावावरून बंगल्यात कामासाठी आला. त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून जानेवारी महिन्यात बॅगेमधून कपाटाची चावी चोरली आणि कपाटातील सोन्याची पाच बिस्किटे आणि १० हजारांची रोकड काढून घेतली. नंतर संशयिताने कामावर येणे बंद केले, परंतु त्याचे वडील श्रीपत म्हसे नियमितपणे कामावर येत होते. त्यांचा मुलगा परभणी जिल्हातील सेलू या मूळ गावी परत गेला. दरम्यान, चोरीचा प्रकार पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसरीकडे परभणी येथे त्या अल्पवयीन मुलाला सोन्याचे बिस्कीट विकताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हा सर्व प्रकार श्रीपत म्हसे यांना सहन झाला नाही. त्यांना कमालीचे नैराश्य आले. म्हसे कुटुंबावर यामुळे मानसिक आघात झाला. यातून म्हसे यांनी मंगळवारी उशिरा घर सोडले. भगूर बस स्थानक परिसरात त्यांनी विषारी औषध घेतले.
त्यांना त्रास होऊ लागताच इतर प्रवाशांनी म्हसे यांच्या भ्रमणध्वनीवरून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत त्यांना देवळालीच्या छावणी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. देवळाली पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंद करण्यात आली आहे. म्हसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे.