जळगाव : जिल्ह्यातील भवरखेडा (ता.धरणगाव) येथे रील करणाऱ्या तरूणाचा पुरलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरूवारी दुपारी गावालगतच्या तलावात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या तपासात मुलाची हत्या करून वडिलांनीच त्याला गावातील एका जेसीबी चालकाच्या मदतीने पुरल्याचे व दुसऱ्या दिवशी स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
अहिराणी भाषेत रील तयार करणारा हितेश उर्फ विकी पाटील (२२) आणि त्याचे वडील माजी सैनिक विठ्ठल पाटील (५२) यांच्यात कायम किरकोळ कारणावरून वाद होत असत. त्यामुळे विकी आणि त्याचे आई-वडील एरंडोल शहरात वेगळे राहायचे. सोमवारी रात्री दोघांमध्ये भवरखेडा गावापासून थोड्या अंतरावर नेहमीप्रमाणे जोरात भांडण झाले. मध्यरात्री साधारण १२ वाजता दोघेही भवरखेडा गावात पोहोचल्यावर दोघांमधील वाद विकोपाला जाऊन झालेल्या हाणामारीत विठ्ठल पाटील यांच्या हातून मुलाची हत्या झाली. कोणाला काही कळायच्या आत विठ्ठल पाटील यांनी गावातील जेसीबी चालकाला बोलवून विकीचा मृतदेह भवरखेडा गावालगत असलेल्या गोविंद महाराज तलावाच्या परिसरात पुरला. घटनेनंतर विठ्ठल पाटील हे एरंडोल येथे घरी गेले. मंगळवारी पहाटे त्यांनी स्वतः गळफास घेतला.
तत्पूर्वी, पोटच्या मुलाची हत्या करून त्यास भवरखेडा गावालगतच्या तलावातील पाण्यात बुडवून मारल्याचे त्यांनी एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते. त्या चिठ्ठीच्या आधारे धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले व कर्मचाऱ्यांनी भवरखेड्यातील तलावाच्या पाण्यात विकीचा मृतदेह शोधला, पण तो कुठेच आढळून आला नाही. गुरूवारी दुपारी तलावाच्या परिसरातच विकीचा मृतदेह पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जेसीबीने खोदकाम करून विकीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, मृत विकीचा मृतदेह पुरण्यासाठी विठ्ठल पाटील यांना मदत करणारा भवरखेडा गावातील जेसीबी चालक घटना घडल्यापासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.