नाशिक : अन्न व औषध प्रशासनाने अंबड येथील अग्रवाल ॲण्ड कंपनी आणि पंचवटीतील दत्त एंटरप्रायजेस या ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा संशयित खाद्यतेल व मसाल्याचा साठा जप्त केला.
दिवाळीत विविध प्रकारच्या मिठाईने शहरातील दुकाने सजली आहेत. आकर्षक मिठाई खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासन खवा, मावा, तूूप, तेल व मिठाईच्या शुद्धतेवर नजर ठेवून आहे. आरोग्यास हानीकारक ठरेल, अशी मिठाई विकली जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत अंबड येथील अग्रवाल ॲण्ड कंपनी या पेढीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मिथ्याछाप सूर्यफूल तेलाची विक्री केली जात असल्याचे आढळले. रिफाइंड सूर्यफूल तेलाचे दोन नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित एक लाख ३० हजार रुपये किंमतीचा ७९० लिटरचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
हेही वाचा…दिवाळीमुळे फुलांच्या दरात वाढहेही वाचा…
दुसरी कारवाई पंचवटीतील सिद्धिविनायक परिसरातील दत्त एंटरप्रायजेसवर करण्यात आली. या ठिकाणी विनापरवानगी अन्न पदार्थांचे उत्पादन करून विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. येथून शाही खीर मसाला, टिक्का मसाला, गरम मसाला यांचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. उर्वरित ३२९० पाकिटे आणि खुल्या स्वरुपातील गरम मसाला २२ किलोचा साठा जप्त करून तो विक्रेत्याच्या ताब्यात ठेवला गेला. त्याची किंमत ६७ हजार ८५० रुपये आहे. नमुने तपासणीसाठी पाठविले गेले असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई होईल. असे या विभागाने म्हटले आहे. नागरिकांनी सणोत्सवात पेढे, बर्फी यासह इतर कोणतीही मिठाई खरेदी करताना ती दुधापासून बनविले असल्याची खात्री करण्याची दक्षता बाळगावी. अन्न पदार्थांबाबत काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यास ती १८००२२२३६५ या टोल फ्री कमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
© The Indian Express (P) Ltd