नाशिक – पंचवटीतील मखमलाबादजवळील वडजाईमाता नगरात एकाच वेळी तीन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने घोड्याच्या शिंगरुला मारले होते. रात्री कुत्र्यांवर हल्ला केला. स्थानिकांनी फटाके फोडून बिबट्यांना पळविण्याचे प्रयत्न केले. मात्र गुरुवारी सकाळी पुन्हा बिबट्या दिसला. या घटनाक्रमाने परिसरात भीती आहे. सकाळी घराबाहेर पडण्यास कुणी धजावत नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात आधीपासून दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. आता आणखी एक पिंजरा लावला जात असल्याचे वन विभागाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मखमलाबाद हा निवासी वस्ती, द्राक्षबागा, शेतमळ्यांचा परिसर आहे. याआधी परिसरात अनेकदा बिबट्यांचे दर्शन घडले आहे. बुधवारी रात्री मात्र एकाच वेळी तीन बिबटे नागरी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वडजाईमाता नगरात माजी महापौर अशोक मुर्तडक यांची शेती आहे. या शेतीला लागून असणाऱ्या नाल्यातून रात्री बिबटे नागरी वसाहतीत आले. बांधकाम सुरू असलेल्या एका प्रकल्पाच्या रेतीवर त्यांनी डेरा टाकला. अंधारात कामगारांना प्रारंभी ती कुत्री असल्याचे वाटले. काही वेळात बिबटे असल्याचे लक्षात आल्यावर संबधितांनी पत्र्याच्या खोल्यांमध्ये धाव घेत आसपासच्या रहिवाश्यांना सावध केले. आरडाओरड झाल्यामुळे बिबटे पळाले. एका कुत्र्यावर त्यांनी झडप टाकली. नागरिकांनी सर्वांना सावध केले. फटाके फोडून बिबट्यांना पळवण्याचा प्रयत्न झाला. ते कुठे अंतर्धान पावले हे स्पष्ट झाले नाही, असे भावांजली सोसायटीत राहणारे भूषण पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> जळगाव : जुन्या तारखेवर स्वाक्षरी करण्यासाठी नऊ हजार रुपये मागणाऱ्या लिपिकाला अटक

गुरुवारी सकाळी वडजाईमातानगर भागातील एका बंगल्याच्या मागील गवतात मजुराला बिबट्याची चाहूल लागली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी पुन्हा बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेतात त्याचे ठसे आढळून आले. मुर्तडक यांच्या शेतातील सीसीटीव्हीतील चित्रणातून बिबट्याचा वावर अधोरेखीत झाला.

काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याच्या १२ महिन्यांच्या शिंगरुचा मृत्यू झाल्याचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले. रात्री तीन बिबटे दिसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरी वस्तीलगत मळ्यांचा परिसर आहे. ज्या नाल्यातून बिबट्या नागरी वस्तीकडे आले, तो नाला झाडाझुडपांनी वेढला आहे. या ठिकाणी बिबट्याला लपण्यासाठी बरीच जागा आहे. बिबट्यामुळे वडजाईमातानगर, शांतीनगर भागात स्थानिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. परंतु, बिबट्याच्या धास्तीमुळे गुरुवारी सकाळी परिसरात कमालीची शांतता होती. कुणी घराबाहेर पडले नाही. लहानग्यांना खेळण्यासाठी घराबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला. रात्री परिसरातून अंतर्धान पावलेले मोकाट कुत्रे सकाळी अवतीर्ण झाले. या बिबट्यांना तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

हेही वाचा >>> नाशिक : महाआरतीसाठी गोदापात्रालगत बांधकामास विरोध

वडजाईमातानगर भागात रात्री तीन बिबटे दिसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सीसीटीव्ही चित्रणात एकच बिबट्या दिसला. वन विभागाने या भागात दोन पिंजरे आधीपासून लावले आहेत. आता नाल्याजवळ आणखी एक पिंजरा लावला जात आहे. वन विभागाच्या पथकाने रात्री आणि दिवसाही शोध मोहीम राबवली. बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. – वृषाली गाडे (वन अधिकारी)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear grips among citizens after three leopards spotted in panchavati area zws
Show comments