तीन जणांना अटक
शहरालगत कमी किमतीत भूखंड देण्याची बतावणी करत पैसे गोळा करणाऱ्या फिनिक्स इन्स्फ्रास्ट्रक्चरने शहर व ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांना सुमारे २५ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे पुढे आले आहे. नागपूरस्थित या कंपनीने राज्यातील इतर भागातही याच पद्धतीने शेकडो गुंतवणूकदारांना फसविले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तीन जणांना अटक केली. आतापर्यंत २०० तक्रारी प्राप्त झाल्या असून पुढील काळात फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मागील वर्षी केबीसी घोटाळा उघडकीस आल्यावर भ्रामक योजनांना गुंतवणूकदार बळी पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु वर्षभरात त्याच स्वरूपाच्या अन्य योजनांमध्ये पैसे गुंतविण्याचे सत्र सुरू राहिले. त्यात पुन्हा गुंतवणूकदारांचे हात पोळले गेले.
उपरोक्त कंपन्यांच्या योजनांमध्ये झालेली फसवणूक आणि नागपूरच्या फिनिक्स इन्स्फ्रास्ट्रक्चर्सने केलेली फसवणूक यामध्ये फरक आहे. दामदुप्पट वा तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून केबीसीसारख्या कंपन्यांनी ग्राहकांना मोहजालात अडकविले. फिनिक्सने तसे न करता नाशिक व ठाण्याच्या आसपाच पाच भूखंड प्रकल्प साकारत असल्याचे दर्शविले. या ठिकाणी भूखंड खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आकृष्ट करून गंडा घातल्याचे दिसते. त्यात नाशिक शहरासह सिन्नर, गिरणारे या भागातील प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी फिनिक्सने अंबडच्या चंद्रकिरण पार्क इमारतीत आलिशान कार्यालय थाटले होते. शहरालगत स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीची मोठी संधी असून त्याकरिता तसे भूखंड देण्याची तयारी कंपनीने दर्शविली. भूखंडात गुंतवणूक करावयाची असल्याने आणि कंपनीचा कारभार मोठा दिसत असल्याने अनेकांनी आपली आयुष्यभराची पुंजी गुंतविली. परंतु, बराच काळ उलटूनही भूखंड काही मिळाला नाही. काहींना त्याबाबतच्या करारनाम्याचे कागदपत्र मिळाल्याचे सांगितले जाते.
भूखंड मिळत नसल्याने ग्राहकांनी पैशांसाठी तगादा सुरू केला असता कंपनीने काहींना धनादेशही दिले. पण ते वटले नाहीत. या एकंदर स्थितीला वैतागून ग्राहकांनी अंबड पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून आतापर्यंत दाखल २०० तक्रारींवरून फसवणुकीची रक्कम २५ कोटीच्या घरात गेली आहे. कंपनीने नाशिकसह याच पद्धतीने उजनी, नाईकवाडी, गिरणारे, देवपूर, सिन्नर भागात गुंतवणूकदारांना फसविले. उपरोक्त ठिकाणी कंपनीविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला.
या प्रकरणी विनायक भट (६२, नाशिक), प्रशांत पताले (३८, नागपूर) आणि विनोद तितरमारे (२७, भंडारा) यांना अटक केली आहे. संशयितांना अटक झाल्याचे समजल्यानंतर गुंतवणूकदार अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले.
कंपनीकडून पैसे वा भूखंड परत मिळत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात असल्याचे मुळे यांनी सांगितले.