नाशिक – महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेवरुन दररोज होणाऱ्या नवनवीन घडामोडी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या अस्वस्थतेत भर घालणाऱ्या ठरत आहेत. पक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मेळाव्यात उमेदवारी जाहीर केल्याने गोडसे निर्धास्त झाले असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने अचानक उचल खाल्ल्याने जागेचा तिढा अधिकच वाढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेचे उमेदवार म्हणून लागोपाठ दोन वेळा विजय मिळविणारे हेमंत गोडसे यांनी शिवसेना दुभंगल्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ दिली. विद्यमान खासदार असल्यामुळे महायुतीत नाशिकची जागा शिंदे गटाला सुटणार असे गृहित धरुन गोडसे यांनी प्रचारही सुरु केला. अलीकडेच नाशिक येथे आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी जोमाने कार्यरत झाले असताना भाजपने दावा सांगणे सुरु केले. भाजपच्या इच्छुक उमेदवारांशी संबंधित गटांकडून समाज माध्यमात गोडसे यांच्यावर निष्क्रिय खासदार म्हणून टिकेचे बाण सोडण्यात येऊ लागले. भाजपची आक्रमकता वाढल्याने अस्वस्थ गोडसे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांसह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घेऊन ठाणे गाठले.

हेही वाचा – राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट कोणतेही आश्वासन न देता दिलासा देण्याचे काम मात्र केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे जिल्ह्यातील आमदार, पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे किती बळ आहे ते दाखवून दिले. फडणवीस यांनीही कोणतेही आश्वासन न देता सकारात्मकता दर्शविली. शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद मिटत नसताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही त्यात उडी घेतली आहे. भुजबळ कुटुंबियांपैकी कोणीतरी या मतदारसंघातून उमेदवारी करण्याची चर्चा सुरु झाली. छगन भुजबळ यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसले तरी अजित पवार गटाने नाशिकवर दावा सांगितल्याचे मान्य केले आहे.

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

हेही वाचा – साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

भाजपकडून महापालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी उमेदवारी करण्याची इच्छा याआधीच जाहीर केली आहे. त्यामुळे ते गोडसे यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिंदे गटाची नाशिक मतदारसंघात ताकद नसल्याने गोडसे यांनी स्वत:हून माघार घ्यावी, असे आवाहनच त्यांनी केले आहे. गोडसे मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा विश्वास बाळगून आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला असला तरी महायुतीकडून ज्या उमेदवाराचे नाव अंतिम होईल, त्यामागे सर्व ताकद उभी करण्यात येईल, असे म्हटले आहे. भाजप आणि अजित पवार गटाच्या दाव्यांमुळे शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight for nashik loksabha seat in mahayuti is more complicated print politics news ssb