धुळे – कामगार पुरविण्याच्या नावाने महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेसह मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी सूचना महापौर प्रतिभा चौधरी यांनी आयुक्त देविदास टेकाळे यांना केली आहे.
शहरातील संपूर्ण स्वच्छता, जलकुंभावर सुरक्षा रक्षक नेमणे, यासह अन्य कामांसाठी कामगार पुरविण्याचा ठेका महानगर पालिकेने आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला दिला आहे. सदर संस्थेबाबत अनेक तक्रारी होत्या. तसेच प्रत्यक्ष उपस्थित कामगारांच्या हजेरीबाबतही प्रश्नचिन्ह होते. यामुळे काही दिवसांपूर्वी महापौर चौधरी यांनी सदर संस्थेच्या सर्व कामगारांची उपस्थिती तपासून कर्मचारी मोजणी केली. यावेळी धक्कादायक वास्तव उघड झाले.
हेही वाचा – नाशिक : हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वर मंदिराचे शुद्धीकरण, आरती
आस्था संस्थेने २२३ कर्मचारी आरोग्य विभागात आणि ५० कर्मचारी पाणी पुरवठा विभागात नेमणूक असल्याचे सांगितले. यावेळी आस्था संस्थेमार्फत २७३ कर्मचाऱ्यांना पगार दिला जात असून मोजणीवेळी केवळ १०४ कर्मचारीच हजर होते. उर्वरीत १५९ कर्मचारी हे लग्न समारंभ, अंत्यविधी तसेच विविध ठिकाणी कामावर हजर असल्याने येऊ शकले नाहीत, अशी माहिती संबंधित ठेकेदाराने महापौरांना दिली. परंतु, महापौर चौधरी यांनी ठेकेदार आणि प्रशासनातील काही अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे बनवेगिरीचे पितळ उघडे पाडले. महापौरांकडे असलेली कर्मचाऱ्यांची यादी आणि ठेकेदाराकडे असलेली यादी, यात मोठी तफावत आढळून आली.
आलेल्या कर्मचाऱ्यांना कुठे काम करतात, याविषयी माहिती देता आली नाही. यामुळे ठेकेदाराची बनवेगिरी उघड झाली. या कामासाठी मनपाकडून दर महिन्याला ३६ लाख ३० हजार १५७ रुपये इतकी रक्कम आस्था संस्थेच्या ठेकेदाराला दिली जात होती. या ठेक्यातून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही खिसे भरले जात असल्याचे उघड झाल्यानंतर ठाकरे गटासह मनसेने आस्था संस्थेसह भ्रष्ट अधिकारी, कर्मचार्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
हेही वाचा – नाशिक : मांजरीने कोंबडीची पिले खाल्ली म्हणून आजोबाला मारहाण
महापौर चौधरी यांनीही या प्रकरणाचा पूर्ण छडा लावला. परिणामी, आस्था स्वयंरोजगार सेवा संस्थेने धुळे महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक केलेली असून सदर संस्थेविरुद्ध तसेच धुळे महानगरपालिकेची आर्थिक लूट करणारे मनपाचे अधिकारी आणि हजेरीबाबत घोळ करणारे स्वच्छता निरीक्षक यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी सूचना महापौरांनी आयुक्त टेकाळे यांना केली आहे.