नाशिक: मुंढेगावच्या जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यातील ८३ कामगारांशी संपर्क होत नसल्याची तक्रार कुटुंबिय करीत असून संबंधितांचा प्रशासनाने शोध घ्यावा, अशी मागणी बाळासाहेबांशी शिवसेना पक्षाच्या इगतपुरी गटाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. कारखान्यातील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली आहे. कंपनी व्यवस्थापन जाणीवपूर्वक आकडेवारी लपवून ठेवत असल्याचा आरोपही या गटाने केला.
पक्षाचे सहसंपर्कप्रमुख माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन निवेदन दिले. जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाल्याचा संशय शिष्टमंडळाने व्यक्त केला. कारखान्यात तीन सत्रात काम चालते. एका सत्रात २२०० कामगार कामावर असतात. त्यातील चार हजार कामगार कारखान्याच्या आवारात राहतात.
उर्वरित कामगार आसपासच्या गावात वास्तव्यास होते, अशी माहिती शिष्टमंडळाने दिली. जिंदाल कारखान्यातील ७०० कामगार घोटीत वास्तव्यास आहेत. त्यापैकी ८३ कामगारांशी संपर्क होत नसल्याचे कुटुंबिय आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे या बेपत्ता कामगारांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली. कंपनी प्रशासनाला दिशाभूल करीत असून व्यवस्थानाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.