नाशिक – शहरात गुरूवार हा आगीचा दिवस राहिला. सकाळी पोकार काॅलनीतील रोहित्राने पेट घेतला. तर म्हसरूळ परिसरातील बांधकाम साहित्य ठेवलेल्या गोदामाला दुपारी तीन वाजता आग लागली. म्हसरुळची आग आटोक्यात आणण्यासाठी चारपेक्षा अधिक बंब मागविण्यात आले होते. कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, लाखो रुपयांचे नुकसान झाले.
म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या जागेत बांधकाम साहित्य ठेवण्याचे गोदाम आहे. याठिकाणी परिसरातील लोक कचरा जाळतात. गुरूवारी दुपारी तीन वाजता कोणीतरी कचरा जाळला. कचरा जळत असतांना ही आग बांधकाम साहित्यापर्यंत पोहचली. हा प्रकार तेथील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्नीशमन विभागाला या विषयी माहिती दिली. ल अग्नीशमन दलाचे मुख्य केंद्र तसेच पंचवटीतील क. का. वाघ महाविद्यालयाजवळील केंद्रावरून आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. बांधकामात स्लॅब टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी पट्ट्या, लाकडी खांब, सिमेंटच्या रिकाम्या गोण्या यासह अन्य सामान आगीच्या विळख्यात सापडले. आग नियंत्रणात आणण्यासाठी एक तासांहून अधिक वेळ लागला. आगीमुळे परिसरात दूरपर्यंत धुराचे लोट पसरले होते. आगीमुळे परिसरातील अन्य घरे काळवंडली.
पोकार कॉलनीत रोहित्राला आग
गुरूवारी सकाळी पोकार कॉलनी परिसरातील एका रोहित्राने अचानक पेट घेतला. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्याबाबत अग्नीशमन तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीला कळवण्यात आले. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रोहित्राला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्नीशमन बंबाच्या मदतीने ही आग अवघ्या काही मिनिटात नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला.