नाशिक : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे बुधवारी पहाटे अंबड लिंक रस्त्यावर लागलेल्या आगीत गोदामासह चार घरे भस्मसात झाली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या मार्गावरील केवळ पार्क भागात ही दुर्घटना घडली. अंबड लिंक रस्ता भंगार बाजार म्हणून ओळखला जातो. या भागात भंगार साहित्याची मोठी दुकाने व गोदामे आहेत. यापूर्वी परिसरात आगीच्या घटना घडल्या आहेत. नववर्षाच्या पहाटे त्याची पुनरावृत्ती झाली. केवल पार्क येथील गोदामाला सकाळी पाच वाजता आग लागली. काही वेळात ती इतरत्र पसरली. आसपासची चार ते पाच घरे तिच्या विळख्यात सापडले. हे गोदाम शकील खान ,चावट सिंह ,सलीम शेख यांच्या मालकीचे आहे. प्लास्टिक साहित्याचे रोल बनवायचे काम येथे सुरू असल्याचे सांगितले जाते. आगीत मोहम्मद शेख (२५) आणि राजू शेख (१९) हे दोघे जखमी झाले. आगीची माहिती मिळताच सातपूर व सिडको अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा… लाचप्रकरणी महसूल सहायकासह पोलीस अधिकारी जाळ्यात
हे ही वाचा… एटीएम कापून पळविण्याचा प्रयत्न, रिक्षाचालकाची सतर्कता
एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या पथकात विजय मुसळे, आबा देशमुख, हर्षद पटेल, सिडको अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रमोद लहामगे, सातपूरचे सोमेश पगार यांचा समावेश होता. आगीत सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीच्या कारणांची स्पष्टता झालेली नाही.