लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : भुसावळ शहरातील डेली मार्केटमधील फळफळावळांसह भाजीपाला व इतर मालाची गोदामे असणार्या भाजी बाजारपेठेला रविवारी आग लागली. या आगीत आठ-नऊ दुकाने खाक झाली. अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली, आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. वीजतारांच्या घर्षणातून आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
भुसावळ शहरातील डेली मार्केटमधील फळांसह भाजीपाला, डाळ, मुरमुरे, पोगा आदी माल साठवणुकीची गोदामे व दुकाने असून, त्यांना रविवारी आग लागली. फळांसह भाजीपाल्याचा लिलाव होत असताना गोदामांसह दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने पालिकेच्या अग्निशमन दलाला भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले. १० ते १५ मिनिटांत अग्निशमन दलाचे १० बंब दाखल झाले. दीड ते दोन तास आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मिळेल तेथून पाणी आणत आग विझविण्यास परिसरातील रहिवाशांनीही मदतकार्य केले. आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून येत होते. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी बंबाद्वारे पाण्याचा मारा केला.
त्यानंतरही बराच वेळ आग धगधगत होती. आगीत आठ ते दहा दुकानांतील लाखोंचे नुकसान झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. प्रत्येक दुकानात दोन ते तीन लाखांचा विविध मालांची साठवणूक होती. अग्निशमन बंब येण्यास आणखी थोडा उशीर झाला असता तर संपूर्ण दुकाने आगीत खाक झाली असती, असेही त्यांनी सांगितले. नुकसान झालेल्या दुकानदारांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.