लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : शहराजवळील प्रसिध्द पांडवलेणी डोंगराला शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाले. वन विभाग आणि महापालिका यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. कोरड्या पानगळीमुळे आग वेगात पसरली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
पांडवलेणी डोंगर परिसर नैसर्गिक वनसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. बिबटे, मोर, रानडुक्कर यांसारख्या प्राणी, पक्ष्यांचे याठिकाणी वास्तव्य आहे. जंगलात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. डोंगरावर असलेल्या लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची दररोज वर्दळ असते. डोंगराला आग लागल्यावर पर्यटकांमध्ये घबराट पसरली. सर्वजण तातडीने खाली उतरले. वन विभाग आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. आग झपाट्याने पसरल्याने त्वरीत नियंत्रण मिळविता आले नाही. तीन तासानंतर आग नियंत्रणात आली. याआधीही डोंगराला आग लागण्याचे प्रकार झाले आहेत. आगीचे कारण शोधण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली आहे.