नाशिक – वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणारे जिल्हा शासकीय रुग्णालय गुरूवारी नवजात शिशु अतिदक्षता कक्षाबाहेरील व्हरंड्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने पुन्हा चर्चेत आले. सुदैवाने यात कुठलाही जिवितहानी झाली नसली तरी मातांमध्ये घबराट पसरली होती.कधी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हल्ले, कधी रुग्णालयाचा ढिसाळ कारभार, याचा फटका जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना बसतो. गुरूवारी दैनंदिन कामकाज सुरू असताना नवजात शिशु अतिदक्षता कक्षाच्या बाहेरील आवारात दुपारी इलेक्ट्रिक व्यवस्थेतील तारांमधून ठिणग्या उडाल्या. कर्मचाऱ्यांनी ठिणग्या उडत असलेल्या जागेवर अग्निप्रतिबंधक उपकरणांचा तत्काळ उपयोग करत नियंत्रण मिळवले.
दरम्यान, नवजात शिशु अतिदक्षता विभागातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी या सर्वांनी तत्परता दाखवत सर्व नवजात बालकांना बालरोग विभागातील आरक्षित असलेल्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी जिल्हा रुग्णालयात पर्यायी नवजात अतिदक्षता विभाग उपलब्ध होता.
जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य प्रशासनाने तत्काळ दखल घेत या प्रकरणाची माहिती विद्युत विभागाला दिली. सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागातील अभियंत्यांनी घटनास्थळी हजर होत विजेच्या वायरी दुरूस्त करून वीजपुरवठा सुरू केला. त्यानंतर स्थलांतरीत केलेले नवजात शिशु पुन्हा नवजात शिशु अतिदक्षता विभागात स्थलांतर करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले.