नाशिक – मालेगावहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाने रविवादी दुपारी चांदवडजवळील रेणुका देवी मंदिर घाटात अचानक पेट घेतला. कारखान्यांसाठी अवजड यंत्रणा घेऊन जाणाऱ्या या वाहनाला ५० हून अधिक टायर आहेत. घाट उतरताना इंजिनने अचानक पेट घेतला. चालक आणि इतर सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवित वाहनापासून इंजिन वेगळे केल्याने मोठी दुर्घटना टळली.
चालकाच्या तत्काळ निर्णयामुळे वाहनातील ठेवलेली महत्वाची अवजड यंत्रसामग्री आगीपासून वाचवण्यात यश आले. मात्र इंजिनचा भाग जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमा टोल कंपनीच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अवजड यंत्रणा महामार्गावर अडकून पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. चांदवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस आणि सोमा टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. आगीचे कारण समजू शकले नाही.