पंचवटीतील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) हिरवाईने फुललेल्या परिसरातील गवताला आग लागून ३० ते ४० झाडांचे नुकसान झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. ही आग अकस्मात लागली की कोणी जाणीवपूर्वक लावली, याबाबत स्पष्टता झालेली नाही. परंतु त्यात पूर्ण वाढ झालेल्या झाडांसह सहा ते सात फूटपर्यंत वाढलेली झाडे होरपळली. गेल्या वर्षी गवताला आग लागण्याचा प्रकार घडला होता. परिसरातील गवत काढावे, संरक्षक भिंत बांधावी अशी सूचना काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची साशंकता कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
पंचवटीतील दिंडोरी रस्त्यावर मेरी संस्थेची शेकडो एकर जागा आहे. रस्त्याच्या दुतर्फा ही जागा असून मेरीअंतर्गत विविध संस्था तिचा वापर करतात. बरीच जागा मोकळी असून ती हिरवाईने नटलेली आहे. यामुळे एका भागात सुमारे १०० मोरांना नैसर्गिक अधिवास निर्माण झाला आहे. तारवालानगरसमोर मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना अर्थात सीडीओचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात गवताला आग लागून झाडांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. काही वर्षांपूर्वी रोटरी क्लबने परिसरात एक हजार झाडांची लागवड केली होती. त्यांचे संगोपन वृक्षप्रेमी कर्मचाऱ्यांनी केले. सात ते आठ फूट वाढलेल्या या झाडांसह आधीपासून अस्तित्वात असणारी पूर्ण वाढ झालेल्या झाडांना आगीची झळ बसली. पावसाळ्यात परिसरात गवत वाढते. त्याची नंतर काढणी न केल्यामुळे एखादी ठिणगी आगीचे निमित्त ठरते. रविवारी सुटीच्या दिवशी हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. सोमवारी कार्यालयात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना होरपळलेल्या झाडांची अवस्था पाहून धक्का बसला. आगीमुळे ३० ते ४० झाडांचे नुकसान झाले. गेल्या वर्षीही गवताला आग लागल्याने झाडांचे नुकसान झाले होते. दरवर्षी हे प्रकार घडत असताना उपाय केले जात नसल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे.
एका भूखंडावरील गवत काढून त्याचे ढिगारे तसेच पडून आहेत. मध्यंतरी एका कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन मेरी परिसरात आले होते. तेव्हा मेरीची संरक्षक भिंत, गवत काढणी, जलवाहिनीची कामे मांडली गेली होती. त्यांनी अधिकाऱ्यांना किरकोळ स्वरूपाची ही कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले होते. या संदर्भात मंत्रालयातून पत्रव्यवहारही झाला. मात्र पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. किरकोळ स्वरूपाची कामे वेळेत झाली असती तर झाडांचे नुकसान टाळता आले असते, अशी भावना काही कर्मचारी व्यक्त करतात. मध्यवर्ती भागात हिरवाईने नटलेला मेरीचा परिसर शहराच्या सौंदर्यात भर घालतो. हे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी जपवणूक तितकीच गरजेची असल्याचा सूर उमटत आहे.
झाडांच्या संरक्षणासाठी वणवे लागू नये म्हणून विशिष्ट उपाययोजना असते. मेरी परिसरात गवत काढणीचे काम झाले होते की नाही याची खात्री केली जाईल. गवताला लागलेली आग अकस्मात होती की जाणीवपूर्वक लावली गेली, याची छाननी करण्यास संबंधित अधिकाऱ्यास सांगण्यात आले आहे. आग कोणी जाणीवपूर्वक लावली असेल तर या संदर्भात पोलिसांत तक्रार नोंदिवली जाईल. – एस. के. घाणेकर (महासंचालक मेरी)