नाशिक – जिंदाल पॉलीफिल्मस कारखान्यात ज्या विभागात स्फोट होऊन आग लागली होती, प्रत्यक्ष त्या ठिकाणी सोमवारी सायंकाळपर्यंत अग्निशमन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या पथकांना पोहोचता आले नाही. आग नियंत्रणात येत असली तरी धूर निघत आहे. रासायनिक पदार्थ पूर्णत: थंड (कुलिंग) झाल्याशिवाय तिथे जाता येणार नाही. धुमसत्या आगीने इमारतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीत तिथे शिरकाव करणे धोकादायक आहे. त्यामुळे उपरोक्त विभागात आणखी काही कामगार अडकले होते का, याची खातरजमा करता आलेली नाही. तसेच आगीचे कारण शोधणे अशक्य झाले आहे. ही छाननी करण्यास आणखी एक- दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>> मद्यपी १३४ वाहन चालकांविरुध्द ७९ हजार रुपयांचा दंड वसूल; नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांची कारवाई
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या या प्रकल्पात स्फोटानंतर लागलेली आग दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी काहिशी नियंत्रणात आली. पण तिची धग कायम असून धूरही निघत आहे. नाशिक महापालिकेसह लष्कर, एचएएल, मऔविमच्या अग्निशमन पथकांनी आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. एनडीआरएफचे पथकही दाखल झाले. या परिसराचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आला. या दुर्घटनेत जखमी आणि मृत झालेल्या कामगारांची ओळख पटली आहे. महिमा कुमारी आणि अंजली यादव या दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला. तर जखमींची संख्या १९ वर पोहोचली असून अन्य एक कामगार बेपत्ता आहे. पॉली उत्पादन विभागात स्फोट होऊन ही आग लागली. तीन मजली ही इमारत आहे. धुमसत्या आगीत तिच्या रचनेचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळावरील रासायनिक पदार्थ थंड झालेले नाही. या स्थितीत प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहणी वा छाननी करणे शक्य झालेले नाही. प्राप्त माहितीनुसार आग लागली तेव्हा तिथे २२ कर्मचारी होते. सोमवारी एका युवकाने भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार केली. हा अपवाद वगळता अन्य कुणी नातेवाईक आपले आप्त बेपत्ता असल्याची तक्रार करण्यास पुढे आलेले नसल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगतात.
हेही वाचा >>> नंदुरबार : राज्यपाल कोश्यारी बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे कर्णधार : ॲड. असीमकुमार सरोदे यांची टीका
बॉयलरचे नुकसान झाले नसल्याने या दुर्घटनेचे कारण काहीतरी वेगळे आहे. परंतु, तज्ज्ञ घटनास्थळी गेल्याशिवाय नेमके कारण शोधता येणार नाही. तिथे पाहणी केल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील, असे औद्योगिक सुरक्षा विभागाच्या उपसंचालक अंजली आडे यांनी सांगितले. जखमी कामगारांशी बोलून त्यांचे जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. कारण स्पष्ट झाल्यानंतर उपायांच्या दृष्टीने सूचना केल्या जाणार आहेत. दुर्घटनेनंतर शासकीय आश्रमशाळेत स्थलांतरीत केलेले कामगार पुन्हा कारखान्यातील निवारागृहात परतू लागले आहेत.
रासायनिक घटकांचा असमतोल ?
दुर्घटनेमागे बॉयलरचा स्फोट हे कारण नसण्याची शक्यता पुढे आल्यानंतर रिॲक्टरमध्ये रासायनिक घटकांचा समतोल बिघडल्याने स्फोट होऊन ही घटना घडल्याचा अंदाज होत आहे. अर्थात चौकशी व पाहणीअंती त्याची स्पष्टता होणार आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी घटनास्थळावरील रासायनिक पदार्थ अद्याप थंड झालेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष तिथे पडताळणी करणे शक्य झालेले नसल्याचे नमूद केले.
जखमींची संख्या १९ वर
जिंदाल दुर्घटनेत मृत व जखमी झालेल्या कामगारांची ओळख पटली आहे. आगीत महिमा कुमारी व अंजली यादव या दोन महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर मनोज पाठक, श्रध्दा गोस्वामी, गजेंद्र सिंग, याचिका कटीयार, पबित्रा मोहंती, लखन सिंग, हिरामणी यादव, अब्बू तालीब, कैलास सिंग, सूर्या रावत, श्याम यादव, राकेश सिंग, गणेश यादव, सरजित कुमार सिंग, पूजा सिंग, परम रस्तोगी, प्रकाश सिंग हे रुग्णालयात उपचार घेत असून जालीकुमार प्रजापती आणि लवकुश कुशवाह हे दोन कामगार ट्रामा केअरमध्ये दाखल असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.