पर्यटन महामंडळाचा उपक्रम
बच्चे कंपनीला उन्हाळी सुटी लागली की, पालकांसमोर ‘पुढे काय’ असे प्रश्न उभे राहतात. शिबीर वा तत्सम उपक्रमात विद्यार्थ्यांना गुंतविले जाते. मात्र, संपूर्ण सुटीचे नियोजन करणे अवघड ठरते. या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटनाला चालना देतानाच जुन्या काही गोष्टींची आजच्या पिढीला गाठ घालून देण्यासाठी २० मे ते ३० जून या कालावधीत अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे अनोख्या काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
उन्हाळी सुटी कशी घालवता येईल यासाठी कुटुंबियांसह सर्वजण नियोजन करतात. प्रत्यक्षात सुटीचे पहिले काही दिवस शिबिरे, कार्यशाळा, खेळ यामध्ये निघून जातात. नंतर नवीन काही उपक्रम नसल्याने विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटायला लागते. पर्यटन महामंडळाने या सुटीचा धागा पकडून डेक्कन ट्रॅव्हल्स कापरेरेशनच्या सहकार्याने भंडारदरा येथे खास ‘काजवा महोत्सव’ आयोजित केला आहे. या कालावधीत भंडारदरा येथे बहुसंख्येने काजवे काही विशिष्ट झाडांवर आढळून येतात. त्यांच्या लयबध्द लुकलुकण्याने अंधारातही प्रकाशाचा भास होतो. आजच्या पिढीला शब्दश काजवा समजावा, तो जवळून अनुभवावा यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या शिवाय परिसरातील तांदुळ गिरणी, अमृतेश्वर मंदिर, स्थानिक मार्गदर्शकांच्या मदतीने परिसरातील इतर पर्यटन स्थळांना भेट देता येईल. महोत्सव काळात खवय्यांसाठी विशेष बडदास्त ठेवण्यात आली आहे. आदिवासी पध्दतीच्या जेवणासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
भंडारदरा येथे जाण्यासाठी डेक्कन ट्रॅव्हल्स कॉपरेरेशनच्यावतीने वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ०२५३-२५७००५९, ९९२३३ १६७७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बडे-मिसाळ यांनी केले आहे.