जळगाव – जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून सोमवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक, सामान्य पोलीस निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुक्ताईनगर मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार ताफ्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाला आहे. अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन हे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष असून, स्वपक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. पहाटे एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. मोठा आवाज ऐकल्यानंतर शेख यांनी बाहेर येऊन पाहिल्यावर त्यांना खिडकीची काच फुटल्याचे दिसून आले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाला होता.

हेही वाचा >>>लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांनी चौकशी केली असता, रस्त्यावर तीन रिकामी काडतुसे आढळून आली. तसेच शेख यांच्या खोलीत एक गोळी सापडली. पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रण तपासले जात असून पहाटे शेख यांच्या घराजवळ एक मोटारसायकलही आढळून आली. त्या संदर्भात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing at the house of an independent candidate in jalgaon news amy