मालेगाव – येथील माजी महापौर अब्दुल मालिक यांच्यावर रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत अब्दुल मालिक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने मालेगाव शहरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
मालिक हे रात्री एक वाजेच्या सुमारास येथील जुना राष्ट्रीय महामार्गावरील पिवळा पंप भागात एका दुकानासमोर आपल्या मित्रांसह बसले होते. यावेळी अचानक आलेल्या दोघा हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. एक गोळी छातीत घुसली असून दुसरी गोळी पायाला लागली. आणखी एक गोळी हाताला स्पर्श करुन गेली आहे.
हेही वाचा – नाशिक: पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस अपघातात २७ प्रवासी जखमी
या गोळीबारात मालिक हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर नाशिकला हलविण्यात आले. या गोळीबाराचे कारण समजू शकले नसले तरी राजकीय किंवा व्यावसायिक वादातून हा गोळीबार झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालिक हे ‘एमआयएम’चे नेते युनूस ईसा यांचे पुत्र आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर लगेच पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, साहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा – लांब चोचीच्या गिधाडाचे ३४ वर्षानंतर जळगाव जिल्ह्यात दर्शन
आमदार मौलाना यांची टीका..
या गोळीबारप्रकरणी आमदार मौलाना मुफ्ति ईस्माईल यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शहरात ठराविक अंतराने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यावरून पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही धाक असल्याचे दिसत नाही, असे मौलाना म्हणाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी गोळीबाराच्या अशा घटना घडत असतील, तर गल्लीबोळात काय परिस्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित करून मालेगावात जंगलराज सुरू असल्याची टीकाही मौलाना यांनी केली. हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.