नाशिक : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) प्रादुर्भाव वाढत असून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे नंदुरबारमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळल्यानंतर आता नाशिकमध्येही जीबीएससदृश आजाराची लक्षणे एका रुग्णात आढळली आहेत. इगतपुरी तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील ११ वर्षाच्या बालकामध्ये जीबीएसची लक्षणे दिसल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी १० दिवसांपूर्वी कांजण्यासदृश आजाराने त्रस्त झाला. त्यामुळे त्यास आश्रमशाळेतून घरी पाठवण्यात आले. २२ फेब्रुवारी रोजी त्याला उठण्यासही त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी खासगी डाॅक्टरांकडे त्याची तपासणी केली. जीबीएससदृश आजाराच्या लक्षणांमुळे त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सावधगिरी म्हणून आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली. कुठलाही विद्यार्थी जीबीएसने बाधित असल्याचे आढळले नाही. आश्रमशाळेतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्हा रुग्णालयात दाखल ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर विशेषज्ञांचे पथक उपचार करत आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. प्रयोगशाळा चाचणी अहवाल अद्याप प्राप्त नसल्याने रुग्णाचा जीबीएसचा रुग्ण असा उल्लेख करणे योग्य होणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यस्तरावरून प्राप्त जीबीएस आजारासंबंधित निदान व उपचाराच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्राथमिक तपासणी सुरू असून लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.