नाशिक – राज्यात ठिकठिकाणी गुइनेल बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळत असताना नाशिक शहरातही जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला असून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. जीबीएसने शहरात शिरकाव केल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
राज्यात जीबीएस रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही रुग्णांचा मृत्युही झाला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, धुळे पाठोपाठ नाशिक येथेही जीबीएसचा शिरकाव झाला आहे. शहरातील पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या ६० वर्षांच्या व्यक्तीस जीबीएस आजार झाला आहे. त्यांनी खासगी रुग्णालयात प्रारंभी उपचार घेतले. परंतु, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याविषयी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी माहिती दिली. जिल्हा रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी १० खाटांचा कक्ष करण्यात आला आहे. रुग्णाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.